News Flash

पिंपरीत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट!

पत्रकारिता, सामाजिक कार्याच्या माध्यमातून गैरप्रकार

पत्रकारिता, सामाजिक कार्याच्या माध्यमातून गैरप्रकार

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात तोतया पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सुळसुळाट झाला असून न्यूज पोर्टल तसेच साप्ताहिकांमध्ये पत्रकार असल्याचे भासवत त्या माध्यमातून सर्रास गैरप्रकार केले जात आहेत. भरीस भर म्हणून कथित सामाजिक संस्थांमधील कार्यकर्त्यांनीही उच्छाद घातला आहे. अशा संस्थांमध्ये तसेच साप्ताहिकांमध्ये काम करणारे पत्रकार ओळखपत्र दाखवून गैरप्रकार करतात. भीतिपोटी अशा तक्रारी पोलिसांकडे दाखल होत नाहीत. मध्यंतरी वाकड भागात एका महिलेची सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी न्यूज पोर्टलच्या पत्रकाराला अटक करण्यात आल्यानंतर अशा प्रकारच्या न्यूज पोर्टल, पत्रकार आणि कथित संपादकांची माहिती घेण्याचे काम  पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे.

मध्यंतरी वाकड भागात शबनम न्यूज पोर्टलचा पत्रकार असल्याचे सांगणाऱ्या एका पत्रकाराला महिलेची सोनसाखळी हिसकावताना पकडण्यात आले होते. त्याच्याकडून शबनम न्यूज पोर्टलचे ओळखपत्र जप्त करण्यात आले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने शहरातील  न्यूज पोर्टल, साप्ताहिकांचे मालक आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या पत्रकारांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अशा तोतया पत्रकारांची चौकशी आणि माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट केले. पोलीस किंवा पत्रकार असल्याचे सांगताच सामान्य नागरिक थोडासा कचरतो. तोतया पोलीस असो वा पत्रकार, अशा अपप्रवृत्ती समाजात बोकाळता कामा नयेत. पत्रकारितेसारख्या व्यवसायात शिरलेल्या अपप्रवृत्तींमुळे संपूर्ण पत्रकारितेला गालबोट लागते, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातील काही साप्ताहिक तसेच न्यूज पोर्टलच्या मालकांनी आधिकृत नोंदणीदेखील केली नाही. ते विनापरवाना न्यूज पोर्टल चालवीत आहेत. संबंधित न्यूज पोर्टलचे मालक तसेच तेथे काम करणाऱ्या पत्रकारांची चौकशी पिंपरीतील परिमंडल तीन पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. काहींना पत्रकारितेचा गंध नाही. पोलिसांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदांना काही जण हजेरी लावतात. पिंपरी पालिकेत अशा तोतया पत्रकारांचा सुळसुळाट झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. न्यूज पोर्टलचे ओळखपत्र दाखवून काही जण गैरप्रकार करत असल्याच्या तक्रारी पोलिसांपर्यंत आल्या आहेत. अशा प्रकारच्या न्यूज पोर्टलच्या ध्वनिचित्रफीत यूटय़ूबवर अपलोड केल्या जातात.

कथित सामाजिक कार्यकर्त्यांचा उच्छाद

पत्रकार तसेच सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते असल्याची बतावणी करून अनेकांकडून पैसे उकळले जातात. पिंपरी पालिकेत माहिती अधिकारात माहिती मागवण्याची धमकी देऊन काही कथित कार्यकर्ते पैसे उकळतात. अशा कार्यकर्त्यांचा पिंपरी पालिकेत वावर असतो. काही तोतया पत्रकारांचे गट पोलीस तसेच महापालिकेत आयोजित केल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदांना हजेरी लावतात.

तोतया पत्रकार तसेच सामाजिक संस्थांचे ओळखपत्र बाळगून फसवणूक गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. साखळीचोरीच्या गुन्हय़ात एकाला पोलिसांनी नुकतेच पकडले. पिंपरी-चिंचवड शहरात काही न्यूज पोर्टल, साप्ताहिक आणि सामाजिक संस्था आहेत. अशा न्यूज पोर्टलच्या मालकांनी अधिकृत नोंदणी केली आहे का,  तसेच त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. अपप्रवृत्तींमुळे पत्रकारितेला गालबोट लागते, त्यामुळे अशा तोतयांची चौकशी करणे गरजेचे आहे.      – गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडल तीन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 12:34 am

Web Title: fake journalist in pune
Next Stories
1 पुलंचे ‘तीन पैशाचा तमाशा’ नाटक पुन्हा रंगमंचावर
2 पावसातही पाणीटंचाई
3 सुविधा, सुरक्षितता आणि दिरंगाई
Just Now!
X