खासगी बसमधून गुजरातमधील खवा विक्रीस; गणेशोत्सवानिमित्त प्रशासनाची कारवाई

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना उत्सवासाठी गुजरातमधून पाठविण्यात आलेला साडेतीन हजार किलो खवा गुन्हे  शाखेने सोमवारी पकडला. या कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली. या प्रकरणी आराम बसच्या चालकांसह एका विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

सहकारनगर, धनकवडी भागात गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन जाधव गस्त घालत होते. घरफोडी करणाऱ्या चोरटय़ांचा वावर या भागात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्या वेळी पद्मावतीनजीक खासगी आराम बसमधून भेसळ केलेला बनावट खवा विक्रीसाठी पुण्यात पाठविण्यात आला असल्याची माहिती जाधव यांना मिळाली. खातरजमा केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना या बाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम यांनी दिली. पद्मावती भागातील खासगी आराम बसच्या थांब्यानजीक पोलिसांनी सापळा लावला. अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी प्रशांत गुंजाळ, कुलकर्णी, स्वाती म्हस्के तेथे आले. गो-गंगा, भाग्यलक्ष्मी, वीरकृपा या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून आलेला ३५०० किलो खवा जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, सचिन जाधव, इरफान मोमीन यांनी ही कारवाई केली. या प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपनीचा बसचालक तसेच बनावट खवा घेऊन आलेला भावेश पटेल यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.