कामधंदा नसल्याने पोटापाण्यासाठी झटपट पैसे कमावण्याच्या हेतूने बहिण-भावाने युट्युबवर व्हिडिओ पाहून चक्क बनावट नोटा छापल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हा प्रकार घडला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शंभर रुपयांच्या ३४ बनावट नोटा, प्रिंटर, कागदी रिम असा एकूण ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुनीता प्रदीप रॉय (वय २२) आणि दत्ता प्रदीप रॉय (वय १८) दोघेही रा. घोटावडे फाटा, पुणे अशी अटक करण्यात आलेल्या बहिण-भावाची नावे आहेत. पुण्यातील उत्तम नगर परिसरात सुनीता आणि दत्ता राहण्यास असून हे दोघेजण घरातच एका खोलीत शंभर रुपयांच्या बनावट नोटा छापत असतं. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांनी पैसा कमावण्याचा हा शॉर्टकट शोधला होता.

सुरुवातीला त्यांनी शेकडो नोटा छापल्या मात्र त्या व्यवस्थित छापल्या न गेल्याने त्यांनी युट्युबवरील बनावट नोटांचा व्हिडिओ पाहून पुन्हा प्रयत्न केला. यावेळी १०० रुपयांच्या ३४ नोटा छापल्या गेल्या. परंतु, या बाजारात खपवायच्या कशा असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी पुण्यातील उत्तम नगर येथून भोसरी येथील गव्हाणे वस्तीमधील भाजी मंडईची निवड केली. त्याप्रमाणे दोघेही बहीण-भाऊ भाजी घेण्यासाठी भोसरीमध्ये आले. भाजी खरेदी केल्यानंतर त्यांनी भाजी विक्रेत्याला शंभर रुपयांची बनावट नोट दिली. मात्र, नेहमीपेक्षा नोट वेगळी वाटत असल्याने भाजीविक्रेत्याला याचा संशय आला. याबाबत भाजीविक्रेत्याने विचारले असता सुनीताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील काही महिलांनी तिला पकडून चोप दिला. सुनीताने बेशुद्ध पडल्याचे नाटक केले. त्यामुळे महिला आणि नागरिक घाबरून बाजूला झाले याचा फायदा घेत सुनीता तिथून पळून गेली.

दरम्यान, आरोपी दत्ताला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक चौकशी केली असता सुनिताला देखील दुसऱ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. दरम्यान, बनावट नोटा छापत असल्याची कबुली दोघांनी दिली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली. त्यानंतर दोघा आरोपींना अधिक तपासासाठी भोसरी पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले.