पुणे शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ात मॉडेल कॉलनी, तसेच विद्यापीठ रस्ता व परिसरातील काही भूखंडांसंबंधी शेकडो नागरिकांच्या नावाने बनावट हरकती नोंदवण्यात आल्याचा प्रकार बुधवारी महापालिकेत उघड झाला. हा प्रकार मनसेच्या एका नगरसेवकाने केल्याची जोरदार चर्चा महापालिकेत ऐकायला मिळाली. भाजपच्या नगरसेविका नीलिमा खाडे यांच्या नावानेही खोटी हरकत नोंदवण्याचा प्रकार घडला आहे.
विकास आराखडय़ावरील हरकती-सूचनांची सुनावणी सध्या महापालिकेत सुरू असून ज्या नागरिकांनी हरकत नोंदवली आहे त्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात येत आहे. पुलाची वाडी, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर गावठाण वगैरे भागात राहणाऱ्या सुमारे दोनशे नागरिकांना बुधवारी सुनावणीला उपस्थित राहण्याची पत्र पालिकेतर्फे पाठवण्यात आली होती. ही पत्र घरोघरी गेल्यानंतर नागरिक चकितच झाले. ज्यांना बुधवारी उपस्थित राहण्याचे पत्र पाठवण्यात आले होते त्यांनी आराखडय़ावर कोणतीही हरकत नोंदवली नव्हती आणि त्यांचे त्याबाबत काही म्हणणे देखील नव्हते. त्यामुळे हरकत नोंवदलेली नसतानाही पत्र का आले, असा प्रश्न त्यांना पडला. शालेय विद्यार्थ्यांच्याही नावे अशी पत्र आली होती.
त्यातील अनेक नागरिक या पत्रानुसार बुधवारी दुपारी तीन वाजता महापालिकेत आले होते. त्यानंतर त्यांच्या नावाने बनावट हरकती नोंदवण्यात आल्याचा प्रकार त्यांच्यासमोरच उघड झाला. नगरसेविका नीलिमा खाडे यांच्याही नावाने खोटी हरकत नोंदवण्यात आल्याचे यावेळी दिसले. त्यानंतर नगरसेवक बाळासाहेब बोडके, नगरसेविका खाडे, निलम कुलकर्णी आणि नागरिकांनी पत्रकार परिषदेत या प्रकाराची माहिती दिली. हा प्रकार मनसेच्याच स्थानिक नगरसेवकाने केल्याची चर्चा महापालिकेत होती. मतदार यादीच्या मदतीने शे-दोनशे खोटय़ा हरकती नोंदवून महापालिकेची फसवणूक करण्यात आली असून या प्रकाराचा प्रशासनानेच शोध घ्यावा, अशी मागणी बोडके, खाडे आणि कुलकर्णी यांनी आयुक्तांकडे केली आहे.