‘मेंदूच्या हिवतापा’स कारणीभूत ठरु शकणारा ‘फाल्सिपारम मलेरिया’ राज्यात गेल्या पाच वर्षांत लक्षणीयरीत्या वाढला आहे. गडचिरोली आणि गोंदियामध्ये या प्रकारच्या मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. फाल्सिपारम मलेरियातली वाढ हे चिंतेचे कारण मानले जात असले तरी दुसरीकडे या पाच वर्षांत मलेरियाचे एकूण रुग्ण व मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या मात्र घटल्याचे दिसून येत आहे.
कमी विकसित असलेल्या गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूरसह शहरी भागात मुंबई, रायगड आणि ठाणे या सहा जिल्ह्य़ांमध्येच मलेरियाचा त्रास प्रामुख्याने आढळतो. मलेरियाचे ४ प्रकार असून राज्यात ‘व्हायव्हॅक्स मलेरिया’ आणि ‘फाल्सिपारम मलेरिया’ या दोन प्रकारच्या मलेरियाचे रुग्ण सापडतात. शहरी भागात प्रामुख्याने ‘व्हायव्हॅक्स’ , तर अविकसित भागात ‘फाल्सिपारम’ अशी ढोबळ विभागणी आहे. व्हायव्हॅक्स मलेरिया तुलनेने सौम्य असतो, तसेच तो शक्यतो जिवाला घातक मानला जात नाही. पण फाल्सिपारम मलेरियात मेंदूचा हिवताप (सेरेब्रल मलेरिया) होऊन प्रकृती गंभीर होण्याची शक्यता असते. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०११ मध्ये या गंभीर मलेरियाचे प्रमाण राज्यात २२.१६ टक्के होते. या टक्केवारीत वाढ होऊन चालू वर्षी सप्टेंबरअखेर ते ४८.७३ झाले आहे. मलेरियामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंमध्ये घट झाली आहे. २०११ मध्ये मलेरियामुळे राज्यात ११८ जणांना जीव गमवावा लागला होता, २०१५ मध्ये मात्र ही संख्या २१ झाली आहे.
संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. भारत पुरंदरे म्हणाले,‘फाल्सिपारम मलेरियात रुग्णाचे रक्त कमी होणे, यकृताला सूज येऊन कावीळ होणे, मूत्रपिंडाला सूज येऊन मूत्रपिंडाचे कार्य बंद पडणे किंवा मेंदूचा हिवताप होणे अशा गुंतागुंती उद्भवू शकतात. ‘क्लोरोक्वीन’ची गोळी सहसा व्हायव्हॅक्स मलेरियात सुचवली जाते, तर फाल्सिपारम मलेरियात ‘आर्टिमिसिलिन काँबिनेशन थेरपी’ हे उपचार वापरले जातात.’
‘रुग्णांना लवकर व चांगले उपचार मिळणे शक्य झाले असून त्यामुळे मलेरियाचे मृत्यू कमी झाले आहेत,’ असे राज्याच्या जलजन्य व कीटकजन्य आजार विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी सांगितले.

वर्ष            मलेरियाचे एकूण रुग्ण    गंभीर मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण    एकूण मृत्यू
२०११            ९६,५८४            २२.१६ टक्के        ११८                
२०१२            ५८,४९९            २०.२६            ९६
२०१३            ४३,६७६            २१.०६             ८०    
२०१४            ५३,३८५            ४८.२७             ६८
२०१५ (सप्टें.अखेर)        ३६,७८५            ४८.७३             २१