न्यायाधीशांकडून कामकाजाचा आढावा
कौटुंबिक न्यायालयाच्या स्थलांतराचा प्रश्न मार्गी लागला आहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातील नवीन जागेत येत्या तीन महिन्यात कौटुंबिक न्यायालयाचे स्थलांतर होईल. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शैलजा सावंत यांनी शिवाजीनगर येथे सुरू असलेल्या कौटुंबिक न्यायालयाच्या कामाचा आढावा घेतला.
नवी पेठेतील शास्त्री रस्त्यावरील भारती भवन या इमारतीत गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज चालते. ही जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या दाव्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मोठय़ा संख्येने पक्षकार कौटुंबिक न्यायालयात येतात. सध्याची जागी अपुरी पडत असल्याने न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम होतो. पक्षकार, वकील, समुपदेशकांना बसण्यासाठी तेथे जागा उपलब्ध नाही. तसेच वाहने लावण्यासाठीही जागा नसल्यामुळे अनेकांची गैरसोय होते. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाचे शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातील इमारतीत स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आली होती. शिवाजीनगर परिसरातील इमारतीचे काम पूर्ण झाले होते. मात्र अपुऱ्या निधीमुळे पुढील काम रखडले होते.
अपुरा निधी आणि रखडलेल्या कामकाजासंदर्भात आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून तेथील समस्यांकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी नवीन इमारतीचे बांधकाम येत्या दीड महिन्यात पूर्ण होईल, असे आश्वासन विधी व न्याय खात्याचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले होते.
या संदर्भात कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गणेश कवडे म्हणाले की, कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजाच्या अनुषंगाने दहाजणांची समिती स्थापन करण्यात आली होती. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शैलजा सावंत आणि समितीतील सदस्यांकडून या न्यायालयाच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली. कौटुंबिक न्यायालयाच्या चवथ्या आणि पाचव्या मजल्याच्या कामकाजासाठी चौदा कोटी २७ लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच इमारतीतील नवीन फर्निचर, वाहनतळ, लिफ्ट, संरक्षक भिंत अशा कामांसाठी चार कोटी ९६ लाखांचा स्वतंत्र प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हे दोन्ही प्रस्ताव विचाराधीन आहेत. एकूण मिळून सोळा कोटी २० लाख रुपयांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गृहविभागाच्या मुख्य सचिवांपुढे ठेवण्यात आला होता. तो प्रस्तावही मान्य करण्यात आला आहे.

कौटुंबिक न्यायालयाच्या स्थलांतराचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून रखडला होता. कौटुंबिक न्यायालयाचे स्थलांतर केव्हा होणार याची प्रतीक्षा पक्षकार, वकिलांसह कर्मचाऱ्यांनाही होती. न्यायालयाच्या उभारणीसंबंधीची उर्वरित कामे सुरू आहेत. कौटुंबिक न्यायालयाच्या स्थलांतराला तीन महिन्यांचा कालावधी लागेल.
– अ‍ॅड. गणेश कवडे, कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष