कृष्णा पांचाळ

‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात वारी सुरु असून या वारीत बारामतीतील चहा विकणारे दाम्पत्य सहभागी झाले आहे. या वारीत स्वतः चहा विक्रीचा व्यवसाय करून देवाची भक्ती करत हे दाम्पत्य देहू नगरी ते पंढरपूर असा पायी प्रवास करतात. वारकऱ्यांना चहा विकून या दाम्पत्याची जवळपास ३५ हजार रुपयांची कमाई होते.

आषाढी एकादशीनिमित्त देहू मधून संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यात लाखो वारकरी सहभागी झाले आहेत. या वारीत बारामतीचे सम्राट जाधव, त्यांची पत्नी ज्योती जाधव,मुलगा शिवराज जाधव हे कुटुंब सहभागी झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी हे कुटुंब वारीत सहभागी झाले आहे. रिक्षा चालक असलेल्या सम्राट जाधव यांची तुकाराम महाराज यांच्यावर नितांत भक्ती आहे. ते नियमित देहू नगरीत येत होते. त्यांचं रिक्षा चालवण्यात मन लागत नव्हते, यासाठी त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायात त्यांना भरभरून यश मिळत गेले. गेल्या सात वर्षांपासून ते चहाचा व्यवसाय करतात. त्यांचे बारामती येथे चहाचे हॉटेल आहे.  सध्या सम्राट यांची आई हॉटेल सांभाळत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून वारीत सहभागी होणारे जाधव कुटुंब वारीतही चहा विकतात.  त्यांच्या सुमधुर चहाची चर्चा वारकरी करत आहेत. १० रुपयांना हा चहा वारकऱ्यांना मिळतो. सम्राट यांचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले असून ज्योती यांचे ७ वी पर्यंत शिक्षण झाले आहे. संत तुकाराम महाराज यांची पालखीच्या पुढे जाऊन ते चहाच्या व्यवसाय करतात.थकलेल्या वारकऱ्यांना देवाच्या भक्तीबरोबरच बारामतीचा चहा देखील तितकाच महत्वाचा वाटत आहे.

चहाचा व्यवसाय चांगला सुरु असला तरी जाधव यांना देहू ते पंढरपूरच्या वारीचे वेध लागले होते. मात्र व्यवसाय सोडून ते जमणार नव्हते. त्यामुळे त्यांनी व्यवसायासह वारी करण्याचे ठरवले. यासाठी त्यांची पत्नी ज्योती यांनी देखील पाठिंबा दिला. आता जाधव कुटुंब वारीत सहभागी होतातच आणि त्यासह चहा विकून पैसे देखील कमावतात. छोट्या टेम्पोत ते व्यवसाय चालवतात. त्यांना पंढरपूर पर्यंतच्या प्रवासात ३५ हजार रुपये मिळतात. यामुळे देवाची भक्ती आणि व्यवसाय याचा संगम जाधव कुटुंबियांनी घडवून आणला आहे.

पत्नीची सोबत आहे म्हणून एवढा मोठा पल्ला पार करू शकतो. गाडी कधीच दगा देत नाही किंवा काही अडचणी येत नाहीत, अशी भावना ‘लोकसत्ता ऑनलाइन’ शी बोलताना सम्राट यांनी व्यक्त केली.