मृत व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचे आदेश

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सहा वर्षांपूर्वी झालेल्या मोटारीचे टायर फुटून झालेल्या अपघातात एका खासगी कंपनीतील व्यवस्थापकाचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यवस्थापकाच्या कुटुंबीयांना एक कोटी २४ लाख ९५ हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांनी विमा कंपनीला दिले.

खासगी कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक असलेले मकरंद पटवर्धन (वय ३८) यांच्या कंपनीतील सहकाऱ्याचा २५ डिसेंबर २०१० रोजी विवाह होता. पटवर्धन आणि त्यांचे कार्यालयीन सहकारी विवाहासाठी २५ डिसेंबर रोजी मोटारीतून मुंबईला निघाले होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर त्यांच्या मोटारीचा टायर फुटला आणि त्यांचे सहकारी मोटारचालक बलबीर बात्रा यांचे नियंत्रण सुटले. मोटार खड्डय़ात कोसळली. या अपघातामध्ये पटवर्धन यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर पटवर्धन कुटुंबीयांकडून त्यांची पत्नी मृणाल, वडील जयंत आणि आई सरला यांनी मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे भरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केला होता.

पटवर्धन कु टुंबीयांकडून ८० लाख रुपयांची भरपाई मागण्यात आली होती. मोटारचालक बात्रा आणि विमा कंपनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीविरोधात दावा दाखल करण्यात आला होता. इन्शुरन्स कंपनीकडून टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याचा बचाव करण्यात आला होता. अपघात म्हणजे दैवी कृत्य असल्याचा बचाव करण्यात आला होता. पटवर्धन यांचे वकील अ‍ॅड. बागमार आणि कांकरिया यांनी तो खोडून काढला. मोटारीची देखभाल करणे, मोटारीची सव्‍‌र्हिसिंग करणे ही चालकाची जबाबदारी आहे. अ‍ॅड. बागमार आणि अ‍ॅड. कांकरिया यांनी दर्शकुमारी विरूद्ध स्टेट ऑफ पंजाब या खटल्याचा निवाडा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. या निवाडय़ामध्ये टायर फुटणे हे दैवी कृत्य नसल्याचे नमूद करण्यात आले होते, असे त्यांनी आपल्या युक्तिवादात नमूद केले.