प्रवीण तरडे, गिरीश कुलकर्णी, किरण यज्ञोपवित यांचा सहभाग

पुणे : ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या शुक्रवारी (१३ डिसेंबर) होणाऱ्या पुणे विभागीय अंतिम फेरीत यंदा ‘खडा संवाद’ हा अनोखा प्रयोग करण्यात येणार आहे. स्पर्धेदरम्यान चित्रपट-नाटय़ क्षेत्रातील अनुभवी कलावंत गिरीश कुलकर्णी, किरण यज्ञोपवित आणि प्रवीण तरडे यात सहभागी होणार आहेत.

‘लोकसत्ता लोकांकिका’ने सुरुवातीपासूनच आपले वेगळेपण निर्माण केले आहे, हक्काचा मंच निर्माण करून दिला आहे. तीन टप्प्यांत होणाऱ्या या स्पर्धेतून प्रयोगशील आणि आशयसंपन्न एकांकिका सादर होतात. मात्र, महाविद्यालयीन रंगकर्मीच्या जाणिवा आणखी प्रगल्भ करण्याच्या उद्देशाने यंदा पहिल्यांदाच ‘खडा संवाद’ ही अनोखी संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. या उपक्रमात एकांकिका संपल्यानंतर पुढील एकांकिका सुरू होण्याच्या वेळात हे कलावंत त्यांचे नाटय़अनुभव उपस्थित प्रेक्षकांना सांगणार आहेत. या कलावंतांची महाविद्यालयीन आणि एकांकिकांच्या दिवसांपासून आजवरची वाटचाल, त्यातील नाटकाचे महत्त्व या अनुषंगाने हा संवाद रंगेल. या निमित्ताने चित्रपट-नाटय़क्षेत्रातील अनुभवी आणि उत्तमोत्तम कलाकृती केलेल्या कलावंतांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी विद्यार्थी, उपस्थित नाटय़ रसिकांना मिळेल.

स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीत महाविद्यालयीन रंगकर्मीनी साकारलेल्या एकांकिका पाहण्यासाठी पुणेकर नाटय़प्रेमींना निशुल्क आणि मुक्त प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी  वैविध्यपूर्ण विषयांच्या केलेल्या प्रयोगशील मांडणीला या निमित्ताने दाद देता येईल. विभागीय अंतिम फेरीत सवरेत्कृष्ट ठरणारी एकांकिका मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत पुणे विभागाचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. त्यामुळे विभागीय अंतिम फेरीत बाजी मारून महाअंतिम फेरीत जाण्यासाठी महाविद्यालयीन रंगकर्मी जोमाने तालमी करत आहेत.

अंतिम फेरीतील एकांकिका

फग्र्युसन महाविद्यालय (टिळा)

मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड (कन्सेप्ट)

स. प. महाविद्यालय (ऐनावरम)

बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (कुणीतरी पहिलं हवं)

काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय (टॅन्जंट)

 

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या उपक्रमासाठी प्रक्षेपण भागीदार देखील आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.