26 November 2020

News Flash

भालबांमुळेच ‘पीडीए’चे रोपटे बहरले

प्रसिद्ध कलावंतांनी भालबा केळकर यांच्या स्मृती जागवल्या; जन्मशताब्दी वर्षांची सांगता

(संग्रहित छायाचित्र)

प्रायोगिक रंगभूमीच्या क्षेत्रात काळाच्या पुढची नाटके सादर करणाऱ्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’ (पीडीए) या संस्थेचे रोपटे भालबा केळकर यांच्यामुळेच बहरले, अशा शब्दांत ‘पीडीए’च्या नाटकांमध्ये काम करून प्रसिद्ध झालेल्या कलाकारांनी भालबांच्या स्मृती जागविल्या.

‘पीडीए’चे संस्थापक आणि नाटय़कला विषयाचे व्यासंगी प्राध्यापक भालबा केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांची बुधवारी  सांगता झाली. जन्मशताब्दी वर्षांमध्ये प्राध्यापकांच्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आणि प्रायोगिक नाटकांचा नाटय़महोत्सव आयोजित करण्याची तयारी झाली होती. मात्र, करोना साथीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे हे होऊ शकले नाही. तरी कलाकारांच्या पातळीवर दर रविवारी नाटय़विषयक छोटेखानी उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती अजित सातभाई यांनी दिली.

भालबा केळकर यांच्या तालमीमध्ये कलाकार म्हणून घडलेल्या अजित सातभाई आणि राणी पारसनीस यांनी भालबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले.

भालबांनी केवळ माझ्यातील कलाकारच नव्हे,तर लेखक घडविला, अशा शब्दांत अजित सातभाई यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, बँकेच्या नाटय़स्पर्धेतून मला पाहून त्यांनी ‘तू पीडीएमध्ये येशील का’, असे विचारले आणि १९७२ मध्ये माझा संस्थेमध्ये प्रवेश झाला. भालबांच्या दिग्दर्शनाखाली मी ‘जोशी काय बोलतील’ या फार्सिकल नाटकात काम केले होते. विज्ञानकथा ते रामायण-महाभारत असा व्यासंग असलेल्या भालबांची नाटक ही आवड होती. कित्येक नव्या कलाकारांना, दिग्दर्शकांना आणि तंत्रज्ञांना त्यांनी घडविले आहे.

‘पीडीए’च्या माध्यमातून पुण्यामध्ये हौशी नाटय़संस्थेचे रोपटे भालबांनी लावले. या संस्थेतील दिग्गज कलाकार काही ना काही कारणांनी संस्था सोडून गेले, पण भालबांनी श्रद्धेने संस्था सुरू ठेवली, असे राणी पारसनीस यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, मुलींनीही नाटकामध्ये काम करण्यासाठी यावे यासाठी ते आग्रही असायचे. नाटकाचा बारकाईने विचार करणारे भालबा कायिक आणि वाचिक अभिनयाबाबत दक्ष असायचे. त्याचबरोबरीने, पुरुषांशी निकोप मैत्री कशी करावी यादृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले. त्याचा व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी फायदा झाला. व्यावसायिक नाटके करत नसल्याने संस्थेकडे पैसे नसायचे आणि नाटकांतूनही पैसे मिळायचे नाहीत. पण, आहे त्यामध्ये संस्था कशी चालवावी याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. कर्वे रस्त्यावरील हिंगणे निवास महिला

वसतिगृहाच्या सभागृहामध्ये रंगीत तालीम करण्यासाठी दररोज सायंकाळी कलाकार भेटायचे. त्या वेळी नाटकाबरोबरच काय वाचले पाहिजे याविषयी भालबा सांगत असत.

‘फ्रेंच, जर्मन नाटकांचा अनुवाद’

फ्रेंच आणि जर्मन नाटकांचा अनुवाद करण्यासाठी मला भालबांनी प्रोत्साहन दिले. ‘लार्क’, ‘गेंडा’, फिजिसिस्ट’या भाषांतरित नाटकांची पीडीएने निर्मिती करून ती रंगमंचावर आणली. त्यांच्यासमवेत फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये जाऊन हॉलिवूडचे जुने चित्रपट पाहिले होते, असे अजित सातभाई यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2020 12:11 am

Web Title: famous artists evoked the memory of bhalba kelkar abn 97
Next Stories
1 पुण्यात दिवसभरात ४६ करोनाबाधितांचा मृत्यू; आढळले १७८९ नवे रुग्ण
2 रेमडेसिवीरचा वॉर्डबॉयकडून काळा बाजार?; वाढीव दराने इंजेक्शन्स विकल्याचा आरोप
3 ठाकरे सरकार अहंकारी, आमच्या सूचनांची दखल घेत नाही – दरेकर
Just Now!
X