17 February 2019

News Flash

तांदळाचे प्रसिद्ध व्यापारी हिराभाई शहा यांचे निधन

शहा यांच्या पार्थिवावर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

शहरातील प्रसिद्ध तांदूळ व्यापारी आणि सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ हिरालाल डाह्य़ाभाई शहा (वय ८२) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, सुना, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. राजेश शहा आणि जयंत शहा हे त्यांचे पुत्र होत.

शहा यांच्या पार्थिवावर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, पूना गुजराथी बंधू समाज संस्थेचे अध्यक्ष नितीन देसाई, विजयकांत कोठारी या वेळी उपस्थित होते. शहा यांचा जन्म गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्य़ातील पेढामली या गावी झाला. बालपणीच वडिलांचे निधन झाले. आईबरोबर ते पुण्याला आले आणि वयाच्या नवव्या वर्षांपासून काकांच्या व्यापारात त्यांना मदत करण्यास सुरुवात केली. गांधीविचारांचा प्रभाव होऊन इंग्रजीवर बहिष्कार घालण्यासाठी त्यांनी शाळा सोडून दिली. उदरनिर्वाहासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली. तेथे एका पेढीवर काही वर्षे नोकरी करून ते पुन्हा पुण्याला आले. वयाची विशी गाठण्याआधीच त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. अल्पावधीतच त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. आधी आंबेमोहोर आणि नंतर बासमतीसह सर्वच प्रकारच्या तांदळाच्या व्यापारामध्ये हिराभाईंनी केवळ पुण्यातच नव्हे तर देशभरात एक जाणकार आणि सचोटीचे व्यापारी म्हणून नाव कमावले.

तांदळाच्या खुल्या व्यापारावर र्निबध असताना हिराभाईंनी पोहे आणि मुरमुऱ्याचा व्यापार सुरू करून त्यामध्ये लौकिक संपादन केला. ‘प्रवासी पोहे’ या नावाने पोह्य़ाच्या एका प्रकारची चव पुणेकरांच्या पसंतीला उतरवण्याचे त्याचबरोबरीने या उत्पादनांची परदेशात ओळख करून देण्याचे श्रेय त्यांना जाते. पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन, पूना हॉस्पिटल, जनसेवा फाउंडेशन, एच. व्ही. देसाई नेत्ररुग्णालय, कांताबेन महिला उद्योग, महावीर जैन विद्यालय, आरसीएम गुजराथी हायस्कूल, पुण्यभूषण फाउंडेशन, द पूना र्मचट्स चेंबर, गुजराथी केळवणी मंडळ अशा सामाजिक संस्थांशी हिराभाई संबंधित होते.

First Published on July 22, 2016 2:57 am

Web Title: famous rice trader hirabhai shah passed away