News Flash

शास्त्रीय संगीताचे मूळ तत्त्व कायम राहायला हवे!

‘लोकसत्ता’च्या वेबसंवादात प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांचे मत  

‘लोकसत्ता’च्या वेबसंवादात प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांचे मत  

पुणे : अभिजात संगीताच्या सादरीकरणात स्थित्यंतर झाले आहे. पूर्वी रात्रभर चालणाऱ्या मैफिलींमध्ये एक राग दोन दोन तास गायला जात असे. त्या वेळी गाणाऱ्याकडे आणि ऐकणाऱ्यांकडे वेळ आणि संयम होता. आता काळानुरूप वेळेवर मर्यादा आली असली, तरी शास्त्रीय संगीताचे मूळ तत्त्व कायम राहिले पाहिजे, असे मत किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

‘दिलेल्या वेळेत उत्तम गाता आले पाहिजे,’ हा पं. भीमसेन जोशी यांनी दिलेला गुरुमंत्र सर्वानीच आचरणात आणायला हवा, असेही भाटे यांनी सांगितले.

‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमात भाटे यांच्याशी ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक व संगीत अभ्यासक पं. अमरेंद्र धनेश्वर आणि ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी दूरचित्र संवाद साधला. ‘आनंद गंधर्व’ ते ‘बालगंधर्व’ चित्रपटाचे पाश्र्वगायक असा कारकीर्दीचा पट या मुलाखतीतून उलगडला गेला.

भाटे म्हणाले, घरामध्ये बालगंधर्वाची भक्ती होती. बाबांनी ‘नाथ हा माझा’ हे नाटय़गीत शिकवले, ते मी बुलबुल तरंगवर वाजविले होते. मलाही गाता येते हे दहाव्या वर्षी समजले. बालगंधर्व यांच्या नाटय़पदांचे मी चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडून रीतसर शिक्षण घेतले. नाटय़ परिषदेच्या कार्यक्रमात ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी ‘आनंद गंधर्व’ असा माझा गौरव केला होता. ही पदवी मिळाली असली तरी, बालगंधर्व, सवाई गंधर्व, छोटा गंधर्व, पं. कुमार गंधर्व अशा दिग्गज गंधर्वाची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करणारा मी छोटा गायक आहे याची मला जाण आहे.

युवक आकर्षित..  ‘बालगंधर्व’ आणि ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटांनी शास्त्रीय संगीत आणि नाटय़संगीत तरुणांपर्यंत पोहोचविण्याची किमया केली. अनेक युवक आता शास्त्रीय संगीत शिकायला लागले आहेत. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये युवकांची होणारी गर्दी हे त्याचे द्योतक आहे, असे आनंद भाटे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 4:46 am

Web Title: famous singer anand bhate in loksatta web dialogue event zws 70
Next Stories
1 करोना चाचणीसाठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही
2 “करोनाची साथ आटोक्यात का नाही? पुण्यात चाचण्यांसाठी आता IAS अधिकारी नेमा”
3 पुण्यात आढळले ८०७ करोना रुग्ण तर पिंपरीत २७६ नवे रुग्ण
Just Now!
X