वेगळ्या आशयाने गाजत असलेल्या ‘फॅन्ड्री’ या मराठी चित्रपटाचा निर्माता सचिनसाठी ‘मेरे अपने’ झाला आहे. हा सचिन म्हणजे मास्टर ब्लास्टर नाही तर, हा आहे सचिन कांबळे हा युवक. सचिन कांबळे यांच्यावरील वैद्यकीय उपचारांसाठी निर्माते नीलेश नवलाखा हे त्याचे आप्त झाले आहेत.
सचिन कांबळे हा ३२ वर्षांचा युवक वडगाव स्टेशन येथून कान्हे येथे जाण्यासाठी लोकलमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असताना पडले. ३० जानेवारी रोजी झालेल्या या दुर्दैवी अपघातामध्ये त्यांचे दोन्ही पाय तुटले आहेत. त्याचप्रमाणे उजव्या हाताची बोटेही तुटलेली आहेत. ससून रुग्णालयाच्या अहवालानुसार सचिन ९९ टक्के अपंग आहेत. आई-वडील, पत्नी आणि एक वर्षांची मुलगी असे त्यांचे कुटुंब आहे.
सचिन यांच्यावरील वैद्यकीय उपचाराकरिता मदत निधी उभारण्यासाठी ‘मेरे अपने’ संस्थेचे बाळासाहेब रुणवाल आणि दुर्गअभ्यासक प्रमोद मांडे यांनी पुढाकार घेतला आहे. फॅन्ड्री या चित्रपटाला राष्ट्रीय इंदिरा गांधी अॅवॉर्ड जाहीर झाले आहे. या पुरस्कारामध्ये मिळणारी सव्वा लाख रुपयांची रक्कम सचिनच्या उपचारासाठी देणार असल्याचे या चित्रपटाचे निर्माते नीलेश नवलाखा यांनी सांगितले. सचिन यांचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्वे रस्ता शाखेमध्ये खाते असून ६०१६७७७२२०९ हा खाते क्रमांक आहे. सचिनला अर्थसाह्य़ करू इच्छिणाऱ्यांनी या खात्यावर निधी जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेविरुद्धच्या खटल्यामध्ये अॅड. गिरीश शिंदे हे मानधन न घेता सचिनची बाजू मांडणार आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी ९८२२०७७७६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बाळासाहेब रुणवाल यांनी केले आहे.