प्रवासी असल्याचे भासवून साध्या वेशातील वाहतूक पोलीस सध्या भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात कठोर कारवाई करीत असून, याबाबतच्या विशेष मोहिमेमध्ये दोनच दिवसात भाडे नाकारणाऱ्या ६४५ रिक्षा चालकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील २३० रिक्षा चालकांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्तावही प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
रिक्षा चालकाकडून भाडे नाकारण्याच्या अनेक तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात असल्याने पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक शाखेच्या प्रत्येक कार्यालयांतर्गत एक पुरुष व एक महिला कर्मचाऱ्याच्या या मोहिमेवर नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी साध्या वेशामध्ये शहराच्या विविध भागामध्ये थांबून रिक्षा चालकाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगतात. त्यातून भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांचा शोध घेण्यात येत आहे.
शनिवारपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. कारवाईच्या दुसऱ्या दिवशी रविवारी भाडे नाकारणारे ३०६ रिक्षा चालक सापडले. त्यांच्याकडून ३८ हजार ६५० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली, तर ८४ चालकांचा वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. दोन दिवसामध्ये भाडे नाकारणारे ६४५ रिक्षा चालक सापडले. त्यांच्याकडून ८१ हजार ५०० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे रिक्षा चालकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या पुढेही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.