उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचे प्रतिपादन

पुणे : शेतकऱ्यांना पुरेशा सुविधा आणि शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे. कर्जमाफी, वीज बिल माफी ही तात्पुरती मलमपट्टी आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी सोमवारी केले. कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकऱ्यांना सक्षम करणे आवश्यक आहे. शेतीसोबत पशुपालन, दुग्धव्यवसाय किंवा कुक्कुटपालन असे पूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांमध्ये पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते, असेही नायडू यांनी सांगितले.

वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेच्या पदवीप्रदान कार्यक्रमात उपराष्ट्रपती नायडू बोलत होते. राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल, केंद्रीय कृषी विभागाच्या अतिरिक्त सचिव वसुधा मिश्रा, वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचे संचालक के. के. त्रिपाठी या वेळी उपस्थित होते. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेती मंजू नाथ, रौप्यपदक विजेता संतूर आरट, कास्यपदक विजेता सुकुमार एस. यांच्यासह विशेष प्रावीण्य मिळवलेल्या समीक्षा दीक्षित, जॉबल रॉय या विद्यार्थ्यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.

नायडू म्हणाले, कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांना समर्थ बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकासही महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे, गोदामांची, शीतगृहांची उभारणी, सिंचन सुविधा आणि नियमित वीजपुरवठाही आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आवश्यक पूरक सुविधा सामायिक पद्धतीने उपलब्ध करून दिल्यास त्याचाही शेतकऱ्यांना फायदा होईल.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, शेती शाश्वत, नफा देणारी आणि लवचिक बनवणेही गरजेचे आहे. तरच तरुणवर्ग शेतीकडे वळेल. शेतीतील उत्पादन वाढीबरोबरच आपल्याला अन्नधान्याच्या कार्यक्षम वितरणाची गरज आहे. शेती क्षेत्र सुधारण्यासाठी काही अर्थपूर्ण आणि व्यावहारिक उपाय शोधून सध्याच्या धोरण आणि कार्यक्रमांचे सुसूत्रीकरण करण्याची आवश्यकता आहे, असेही नायडू म्हणाले.