राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून या सरकारने उद्योगपतींची कर्जे माफ केली. मात्र हेच सरकार शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यास तयार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारवर टीका केली. शेतकरी कर्जमाफीसाठी चंद्रपूर येथून निघालेल्या संघर्ष यात्रेचे आज पुण्यात आगमन झाले. त्यानंतर बाजार समिती येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते.

राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार आल्यापासून जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्या रोखण्यासाठी हे सरकार कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही, असेही सुनील तटकरे म्हणाले. शेतकऱ्यांच्या मालास हमीभाव मिळत नाही. त्याचबरोबर सात-बारा कोरा झाला पाहिजे, या मागण्यांसाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. या सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास भविष्यात संघर्ष यात्रेचे स्वरूप वेगळे असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सरकारच्या कार्यपध्दतीवरही त्यांनी जोरदार टीका केली. या अधिवेशन काळात या भाजप सरकारने १९ आमदारांचे निलंबन करून मुस्कटदाबीचा प्रकार केला आहे. लोकशाहीचा आवाज दाबला गेला आहे, असे ते म्हणाले.

राज्यातील आणि केंद्र सरकारने जनतेची तीन वर्षांत फक्त दिशाभूल करण्याचे काम केले आहे. त्यातील एक भाग म्हणून या सरकारकडे उद्योगपतींचे कर्जमाफ करण्यास वेळ आहे. मात्र जो शेतकरी जनतेला जगवतो. त्याकडे हे सरकार लक्ष देत नसून, अद्यापही कर्जमाफी आणि शेतमालास हमीभाव जाहीर केला नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. या मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात संघर्ष यात्रा तीव्र केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. या सरकारकडे शेतकऱ्यांसाठी कोणतेही धोरण नाही, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सपाचे नेते अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, अशोक चव्हाण, आमदार जितेंद्र आव्हाड, राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते.