नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नव्या पक्षाची निर्मिती केली. त्यांच्या या भूमिकेची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगते आहे. भाजपने त्यांना हात दिला तर शिवसेना भाजपसोबत काडीमोड घेईल, अशा चर्चांही ऐकायला मिळते आहेत. या परिस्थितीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राणेंच्या व्यक्तीमत्वाचे कौतुक केले. त्यांनी राणेंना नव्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांच्याबद्दल त्यांनी पुण्यात प्रतिक्रिया दिली.

शिंदे म्हणाले की, नारायण राणे हे सकारात्मक विचार करणारे व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे ते निश्चित ध्येयापर्यंत पोहोचतील.
यावेळी त्यांनी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पालाही विरोध दर्शवला. बुलेट ट्रेनपेक्षा सरकारने रेल्वेची परिस्थिती सुधारणे आवश्यक आहे. सध्या आर्थिक सक्षमता नसताना सरकार बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवत आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारचा विकासाच्या धोरणावर ताशेरे ओढले. भाजपची घोषणाबाजी ही भ्रमनिरास करणारी आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर घोषणा हवेत विरल्या असून, भाजपने जनतेचा विश्वास गमावला आहे. विकास कुठेच दिसत नाही. सरकार धोरणे राबवण्यात सपशेल अपयशी ठरले आहे, असे ते म्हणाले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पुन्हा ‘अच्छे दिन’ येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आगामी निवडणुकांमध्ये राहुल गांधी हेच आमचे नेते असणार आहेत. त्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे देण्यासंदर्भात मी स्वत: शिफारस केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.