पुणे प्रतिनिधी :

राज्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी मागील दोन दिवसांपासून संपावर गेला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार कोणतीही ठोस भूमिका घेण्यास तयार नाही. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातील मार्केटयार्ड येथे सरकार हे गाढव असल्याचे सांगत त्या गाढवाला निवेदन दिले. या वेळी सरकार हे गाढव असल्याच्या घोषणाही देण्यात आल्या.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे, शेतकरी कामगार संघटनेचे विठ्ठल पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संतोष शिंदे म्हणाले की, राज्य सरकार आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाहीत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली. या आश्वासनांपैकी एकाचीही अद्याप पूर्तता केलेली नाही. सरकारने शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचे काम केले आहे. आजदेखील शेतकऱ्यांना सरकारने गाजर दाखवण्याचे काम केले आहे. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.