शेतक ऱ्यांच्या मालाला किंमत नाही म्हणूनच देशामध्ये आर्थिक मंदी आहे. शेतक ऱ्यांची क्रयशक्ती वाढल्याखेरीज आथिक मंदी हटणार नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी केले. महागाई कमी करणे म्हणजे शेतमालाचे दर कमी करणे हे सरकारचे धोरण आहे. शेतक ऱ्यांना प्रपंच चालविताना लागणाऱ्या गोष्टींसाठी रास्त दर आणि त्यांनी पिकविलेल्या उत्पादनांना मातीमोल दर हे आम्ही चालून देणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला.
महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघाच्या वार्षिक मेळाव्यामध्ये पवार बोलत होते. ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, माजी राज्यमंत्री विनायकदादा पाटील, ग्रेप ग्रोव्हर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सोपान कांचन, संघाचे अध्यक्ष अशोक गायकवाड आणि उपाध्यक्ष सुभाष आर्वे या वेळी उपस्थित होते. संघाच्या ‘द्राक्षवृत्त’ या स्मरणिकेचे प्रकाशन या प्रसंगी पवार यांच्या हस्ते झाले.
पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला असताना देश सध्या आर्थिक संकटातून जात असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मंदी जरूर आहे. पण, शेतीशी निगडित बहुसंख्य वर्गाच्या लोकांची क्रयशक्ती वाढत नाही, तोपर्यंत बाजार सुधारणार नाही. शेतकऱ्यांच्या हाती पैसा आल्यावर बाजारपेठेत गर्दी वाढते. अशा काळामध्ये सरकारची गुंतवणूक वाढली पाहिजे. यंदाच्या वर्षी पावसाने दगा दिला असला, तरी प्रत्येक तालुक्यामध्ये ५० शेततळी करू शकलो, तर दोन वर्षांत परिस्थिती बदलू शकेल. दीर्घ मुदतीच्या कर्जाचे व्याजदर कमी केले, तर शेतकऱ्याला फायदा मिळू शकेल. पाणी हाच शेतीपुढचा महत्त्वाचा प्रश्न असून यंदा द्राक्षाची छाटणी करायची की नाही हे ठरवावे लागेल. जुलै-ऑगस्ट कोरडा गेला असून आता सप्टेंबरमध्ये पडणाऱ्या पावसावरच भरवसा आहे.
‘यांच्या आसनाला नाही दु:खाची डागणी’ या काव्यपंक्तीतून त्यांना शेतक ऱ्यांची दु:खं कशी कळावीत, असा प्रश्न महानोर यांनी केला. यंदा पाणी कमी आहे. जगणं अवघड झालं आहे. त्यामुळे ऊस, केळं, द्राक्ष या मोठय़ा भावंडांनाच सगळे दोष देणार याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
उसाचे नवे वाण भारतामध्ये
शरद पवार म्हणाले, इंडोनेशियामध्ये कमी पाण्यावर पिकणाऱ्या उसासंबंधीचे संशोधन सुरू आहे. हे बेणं लावल्यावर ४० दिवसांनी पाण्याची पाळी येते. जावा, सुमात्रा बेटावर ४० हजार हेक्टरवर त्यांनी ऊस लावला आहे. त्यामध्ये यश आले तर हे वाण भारतामध्येही वापरून आपण पाण्याचा प्रश्न सोडवू शकतो. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे शास्त्रज्ञ तेथे गेले असून लवकरच मीही त्या देशाला भेट देणार आहे.