पंजाब- हरियाणा सीमेवर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका बासमती तांदळाला बसला आहे. ऐन हंगामात सीमा बंद असल्याने वाहतूक विस्कळीत होऊन पंजाब, हरियाणातून होणारी बासमती तांदळाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बासमतीच्या दरात क्विंटलमागे एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

यंदाच्या हंगामात बासमती तांदळाचे उत्पादन चांगले झाले असले तरी शेतकरी आंदोलनामुळे बासमती तांदळाची आवक ठप्प झाली आहे. आंदोलन संपल्यानंतरच बासमती तांदूळ देशातील बाजारपेठेत उपलब्ध होईल. मागणीच्या तुलनेत बासमती तांदळाची आवक अपुरी आहे. यंदाच्या वर्षी बासमती तांदळाचा हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू झाला. हंगाम सुरू झाल्यानंतर काहीच दिवसांनी पंजाब हरियाणा सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू झाले. त्यामुळे उत्तरेकडील राज्यातून होणारी तांदळाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बासमतीसह उत्तरेकडील तांदळाच्या विविध उपप्रकारांची आवक ठप्प झाली आहे, अशी माहिती मार्केटयार्डातील तांदूळ व्यापारी जयराज अँड कंपनीचे संचालक राजेश शहा यांनी दिली.

बासमती तांदळाला परदेशातून मोठी मागणी असते. गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक बासमती तांदळाच्या मागणीत घट होत चालली आहे. त्याऐवजी प्रक्रिया केलेल्या बासमती तांदळाला (स्टीम बासमती) मागणी वाढत आहे. स्टीम बासमतीचे ११२१, १५०९, १४०१, शेला बासमती हे उपप्रकार आहेत. स्टीम बासमतीला हॉटेल तसेच केटरिंग व्यावसायिकांकडून मोठी मागणी असते. हंगामाच्या सुरुवातीला ११२१ बासमती तांदळाचे दर जागेवरच प्रतिक्विंटल सहा ते साडेसहा हजार असे होते. शेतकरी आंदोलनामुळे बासमती तांदळाच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या ११२१ बासमती तांदळाचे क्विंटलचे दर सात ते साडेसात हजार रुपये असे आहेत. पारंपरिक बासमती तांदळाचे क्विंटलचे दर दहा हजार रुपये आहेत. किरकोळ बाजारातही पारंपरिक बासमती, ११२१ बासमती, अन्य बासमती तांदळाच्या दरात क्विंटलमागे आठशे ते एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

विक्रमी निर्यात शक्य

बासमती तांदळाचा भारत प्रमुख निर्यातदार देश आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत ३१ लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे. त्याचे निर्यातमूल्य वीस हजार कोटी रुपये एवढे आहे. यंदाच्या हंगामात बासमतीची निर्यात उच्चांकी होण्याची शक्यता आहे. साधारणपणे ४५ लाख टनापेक्षा जास्त बासमती तांदळाची निर्यात होण्याची शक्यता असून निर्यातीतून ३० ते ३१ हजार कोटी रुपये एवढे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

यंदाच्या हंगामात बासमतीची लागवड चांगली झाली आहे. शेतकरी आंदोलनामुळे बासमती तांदळाच्या खरेदी-विक्री प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. यंदाच्या हंगामाचा आढावा घेतल्यास  बासमतीची उच्चांकी निर्यात होईल. बासमतीसह तांदळाच्या अन्य प्रकारांना चांगली मागणी राहील. उत्तरेकडील राज्यातील तांदूळ प्रक्रिया उद्योगांनी (राइस मिल) धोका पत्करून तांदळाची वाहतूक करण्यास नकार दिल्याने पुरेशा प्रमाणात बासमती तसेच उपप्रकारांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

– राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम)