राज्यात पावसास विलंब झाल्याने शेतकरी मोठय़ा अडचणींना तोंड देत आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील खरीप हंगामी पीकही शेतक ऱ्यांनी घेतले नसून शेतक ऱ्यांनी हंगामात घ्यावयाच्या पीक पद्धतीत बदल करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे. शेतक ऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत कोणती पिके घ्यावीत याची शिफारस नुकतीच महात्मा फुले कृषि विद्यापीठकडून (राहुरी) करण्यात आली आहे. त्याप्रमाणे जिल्हातील शेतक ऱ्यांनी बदल करावेत, असे सांगण्यात आले आहे.
भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर येथील शेतक ऱ्यांनी पावसाचे आगमन २० जुलैपर्यंत झाल्यास हवामान वर्गीकरणानुसार भात लागवड करताना रोपांचे वय ३ ते ४ आठवडय़ांपेक्षा जास्त झाल्याने पुनर्लागवडीच्या वेळी एका चुडात ३ ते ४ रोपे लावावीत. दोन चुडीतील अंतर नेहमीपेक्षा कमी ठेवावे. पावसाची ३० दिवसांपेक्षा उशिरा सुरुवात झाल्यास पेरणी किंवा टोकन पद्धतीचा अवलंब करावा. तसेच डोंगर माथ्यावरील उथळ जमिनीतील भात रोपांची पुनर्लागवड न करता या ठिकाणी इतर पिकांची लागवड करावी. तसेच २० जुलैनंतर नाचणीऐवजी कारळे, तीळ ही पूर्ण पिके म्हणून घ्यावी.
हवेली, खेड, इत्यादी तालुक्यातील शेतक ऱ्यांनी मूग, उडीद, खरीप ज्वारी ही पिके न घेता त्याऐवजी बाजरी, भुईमूग, सोयाबीन या पिकांची पेरणी करावी. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. शिरूर, बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरी, तूर, सूर्यफूल, सोयाबीन या सारख्या पिकांची पेरणी करावी, असे आवाहन केले आहे.