अपेक्षित भाव मिळत नसल्याने कवडीमोल दराने विक्री
गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे भरणाऱ्या चाकणच्या जनावरांच्या बाजारात अलीकडे वेगळेच चित्र पुढे आले आहे. दुष्काळ व पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे जनावरे सांभाळणे अशक्यप्राय झालेल्या शेतक ऱ्यांचा कल ती जनावरे विकण्याकडे दिसून येत आहे. त्यामुळे विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्या वाढली असताना ती खरेदी करणाऱ्यांची मात्र वानवा आहे. नेहमीच्या तुलनेत खूपच कमी दर मिळत असल्याने कवडीमोल भावाने जनावरे विकण्याची वेळ शेतक ऱ्यांवर आली आहे. दुष्काळासह गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी, बैलगाडा शर्यतीवर बंदी आदी अन्य कारणेही या संदर्भात सांगितली जात आहेत.
साधारणपणे ७० वर्षांपासून चाकणमध्ये जनावरांचा आठवडे बाजार भरतो. खेड, मावळ, मुळशी, दौंड, बारामती, हवेली, जुन्नर, आंबेगाव, पुणे, िपपरी-चिंचवड भागातील शेतकरी आपली जनावरे या ठिकाणी विक्रीसाठी आणतात. त्यामध्ये बैल, गायी, म्हशी, बकरी आदींचा समावेश असतो. यापूर्वी, कोकण भागातूनही शेतकरी येत होते. मात्र, यंदा तिकडचे प्रमाण कमी झाले आहे. यंदाच्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर, जनावरे सांभाळणे शेतक ऱ्यांच्या दृष्टीने अतिशय अडचणीचे झाले आहे. त्यामुळे ती विकण्याकडेच त्यांचा अधिक कल आहे. मात्र, बाजारात योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. नेहमीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के कमी भाव झाल्याने तो परवडत नाही. त्यामुळे एकतर कवडीमोल भावानेही जनावरे विकणे अथवा आल्या पावली परत जाणे, असे पर्याय त्यांच्यासमोर आहेत. केवळ दुष्काळ हेच कारण नसून अन्य कारणेही त्यामागे आहेत. गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी, बैलगाडा शर्यतींवर बंदी आदींचाही त्यामध्ये समावेश आहे. दुष्काळी परिस्थिती नव्हती, तेव्हा याउलट परिस्थिती होती. बैलगाडा शर्यतींच्या बैलांच्या खरेदीसाठी चांगली मागणी होती. आता आता शर्यतीचे बैल विक्रीसाठी आणण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. शासनाने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची सरसकट व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होऊ लागली आहे.
यासंदर्भात, चाकण-खेड कृषी बाजार समितीचे सचिव सतीश चांभारे यांनीही दुजोरा दिला. ते म्हणाले, दुष्काळी परिस्थिती आहे, पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणे अवघड झाल्याने शेतक ऱ्यांचा कल जनावर विकण्याकडे आहे. मात्र, त्यांना खरेदीसाठी ग्राहक मिळत नाही. मिळालाच तर अपेक्षित किंमत मिळत नाही. जनावरांची विक्रीच होत नसल्याने त्यांना परत जाण्याशिवाय पर्याय राहत नाही.