News Flash

पुणे विभागातही शेतकऱ्यांकडे वीजबिलाचे ७८ कोटी थकले

महावितरणच्या पुणे विभागातील शेतकरीही असून, ग्रामीण मंडलातील मुळशी, मंचर, राजगुरुनगर विभागांत शेतकऱ्यांकडे वीजबिलाची ७८ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

राज्यात विविध विभागांत अनेक दिवसांपासून दुष्काळी स्थिती असल्याने कृषी पंपधारक शेतकऱ्यांच्या वीजबिलांची मोठय़ा प्रमाणावर थकबाकी आहे. मात्र, कृषी पंपाच्या या थकबाकीत महावितरणच्या पुणे विभागातील शेतकरीही असून, ग्रामीण मंडलातील मुळशी, मंचर, राजगुरुनगर विभागांत कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे वीजबिलाची सुमारे ७८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी शासनाची कृषी संजीवनी योजना ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या मुदतीत पुणे विभागातील ४० हजार ४४८ कृषी पंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांनी मूळ थकीत रकमेपैकी ५० टक्के रक्कम भरल्यास इतर रक्कम तसेच दंड व व्याज माफ केले जाणार आहे. त्यामुळे एकूण ७८ कोटी रुपयांमधून तब्बल ५२ कोटी रुपयांची माफी मिळू शकणार आहे.
कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने २०१४ रोजी कृषी संजीवनी योजना जाहीर केली होती. त्यानुसार मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरायची आहे. ही रक्कम भरल्यास उर्वरित ५० टक्के मूळ थकबाकी व एकूण थकबाकीवरील व्याज व दंड माफ करण्यात येतो. शेतकऱ्यांनी मूळ थकबाकीतील ५० टक्के रक्कम भरल्यानंतर राज्य शासनाकडून उर्वरित ५० टक्के रक्कम महावितरण कंपनीला अनुदान स्वरूपात देण्यात येते. व्याज व दंडाची रक्कम महावितरणकडून माफ करण्यात येते. योजना सुरू झाल्यापासून यंदाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुणे ग्रामीण मंडलातील मुळशी, मंचर व राजगुरुनगर या विभागांसह रास्ता पेठ व गणेशखिंड मंडलामध्ये ३७ हजार ८३५ थकबाकीदार कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला. या शेतकऱ्यांनी मूळ थकबाकीच्या ५० टक्के म्हणजे १० कोटी ७० लाख रुपयांचा भरणा केला. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीतील ५० टक्के रकमेसह व्याज व दंडाचे १६ कोटी २१ लाख रुपये माफ करण्यात आले.
योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अद्यापही विभागामध्ये ४० हजार ४४८ कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे वीजबिलाची थकबाकी आहे. या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. या शेतकऱ्यांकडे व्याज व दंडासह सुमारे ७८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामधील केवळ २६ कोटी १८ लाख रुपयांचा भरणा झाल्यास उर्वरित ५२ कोटी ५१ लाख रुपयांची माफी दिली जाणार आहे. ही योजना तात्पुरत्या व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी पंपधारकांसाठी त्याचप्रमाणे जलउपसा योजनांसाठी लागू आहे. या योजनेत सहभागी होऊन शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
‘कृषी संजीवनी’ एक दिव्यच!
मूळ थकबाकीच्या केवळ पन्नास टक्के रक्कम भरून वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी असतानाही कृषी संजीवनी योजनेला हवा तसा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत नसल्याचे वास्तव आहे. पुणे विभागातही चित्र फारसे वेगळे नाही. सध्या शासनाच्या सूचनेनुसार कृषी पंपांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई केली जात नाही. दुसरीकडे थकबाकीदारांमध्ये भर पडत आहे. यापूर्वीच्या थकबाकीदारांकडून रकमेची वसुली व्हायची असल्यास संजीवनी योजनेमध्ये शासनाने आणखी अनुदान वाढवून छोटय़ा शेतकऱ्यांना जास्तीतजास्त रकमेची सूट द्यावी, अशी मागणीही केली जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये थकबाकीदारांना संजीवनी योजनेत आणण्याचे दिव्यच असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2016 2:31 am

Web Title: farmers light bill 78 crore outstanding
Next Stories
1 सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे सुरूच
2 राज्यमंडळ ‘व्हॉट्सअ‍ॅपग्रस्त’
3 टीईटीच्या फुटलेल्या परीक्षेचे नियोजन रखडलेलेच
Just Now!
X