शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची सरकारची घोषणा फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात महाराष्ट्रात सुमारे १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. पुलवामा हल्ला झाल्यानंतर दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र यवतमाळला प्रचारात गुंतले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचा प्रारंभ चाकणला पवारांच्या उपस्थितीत झाला, तेव्हा ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अजित पवार, दिलीप वळसे, विलास लांडे, दिलीप मोहिते, मंगलदास बांदल आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, देशापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याची सोडवणूक करणे सरकारला जमले नाही. परिवर्तनासाठी सत्तेचे वापर करण्याचे सूत्र सत्ताधाऱ्यांकडे नाही. शेतकऱ्यांना दोन वेळेचे जेवण मिळण्याची शाश्वती नाही. महागाई वाढली आहे. शेतीमालाला किमती मिळत नाहीत. परिणामी, शेतक ऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर १२ हजार शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आघाडी सरकारने ७० हजार कोटी रुपयांचे शेतक ऱ्यांचे कर्ज माफ केले होते. कर्जमाफी केल्याचे सत्ताधारी सांगतात. आकडेवारी तपासून पाहिल्यास ५० टक्के लोकांनाही त्याचा फायदा मिळाला नाही.

पवार म्हणाले, पुलवामा हल्ला झाला, तेव्हा दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. गृहमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीस पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री हजर नव्हते. माजी संरक्षणमंत्री असल्याने नेमके काय केले पाहिजे, असा प्रश्न मला विचारण्यात आला.

तेव्हा जवानांना दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आदेश देण्याची भूमिका मांडली. मोदींनी काश्मीर खोऱ्यात जे बोलणे अपेक्षित होते. ते यवतमाळला येऊन म्हणाले, की मैं देश का चौकीदार हूँ आणि मेरी ५६ इंच की छाती आहे. खेड-चाकणचे विमानतळ खासदारांमुळे दुसरीकडे गेले. त्यामुळे विमानतळाच्या माध्यमातून होऊ शकणारा विकास होऊ शकला नाही, याकडे पवारांनी लक्ष वेधले. कोल्हे यांनी आपल्या भाषणात मतदारसंघातील १५ वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नांचा पाढा वाचून दाखवला.

लांडे, बांदल यांचे मनोमीलन

शिरूरच्या उमेदवारीसाठी विलास लांडे आणि मंगलदास बांदल इच्छुक होते. मात्र, डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली. त्यावरून राष्ट्रवादीत लांडे आणि बांदल समर्थकांची नाराजी उघडपणे जाणवत होती. चाकणच्या मेळाव्यात लांडे, बांदल यांनी समर्थकांसह हजेरी लावली. आम्ही नाराज नसल्याचे सांगत डॉ. कोल्हे यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.