सव्वाशे कोटी जनतेच्या अन्नाची गरज भागविणारा शेतकरी आज उपेक्षेच्या गर्तेत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात ७५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, आजही शेतीमालाला चरितार्थापुरता रास्त बाजारभाव नाही ही मोठी शोकांतिका आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या पशातून साखर कारखानदारी उभी केली. तिची आजची अवस्था बघवत नसल्याने आता त्यांच्या कराड येथील समाधिस्थळावरच १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची कैफियत मांडणार असून, त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी मोठय़ा संस्थेने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी इंदापूर येथील ऊस परिषदेत केले.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याकरिता त्यांनीच मला निवडणुकीच्या खर्चासाठी लोकवर्गणी करून दिल्लीत पाठवले. शेतकऱ्यांकडून शेतीचे नुकसान करणाऱ्या मेलेल्या हत्तींची किंमत २० कोटी रुपये होते आणि शेतकऱ्यांच्या एका आत्महत्येला शासन १ लाख रुपये अनुदान देते. १ टन उसापासून ५ हजार रुपयांचे उत्पादन मिळते,  तर साखर उत्पादनाचा झालेला खर्च वगळून साखर कारखाने शेतकऱ्यांच्या चरितार्थाइतका पसा का देत नाही, असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले, की शेतकऱ्यांच्या घामाच्या थेंबाथेबाची किंमत वसूल केल्याशिवाय हा संघर्ष आता थांबवणार नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले, परवडत नाही तर साखर विकू नका. शेतकऱ्यांना शेतमाल दराबाबत न्याय न मिळाल्यास शेतकरी राजवट उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत. या वेळी राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, रविकांत धूपकर, नीलेश देवकर आदीची भाषणे झाली.