अतिरिक्त पाणी वापरल्याचा पुणे महापालिकेवर जलसंपदा विभागाचा आरोप

पुणे महापालिकेकडून मंजूर पाणीवापरापेक्षा पाच टीएमसी पाणी जास्त वापरत असल्याचा आरोप जलसंपदा विभागाने केला आहे. या अतिरिक्त पाणीवापराचा फटका रब्बी आणि उन्हाळी सिंचनाच्या आवर्तनावर बसला आहे. पुणे शहराचा वार्षिक पाणीवापर १६.५० टीएमसी असून, गेल्या वर्षभरात मंजुरीपेक्षा पाच टीएमसी पाणी जास्त वापरल्याचे जलसंपदा विभागाने अहवालात म्हटले आहे.

खरीप हंगामातील सिंचनाच्या सद्य:स्थितीचा आढावा कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामध्ये जलसंपदा विभागाकडून पाणी वापराबाबत अहवाल सादर करण्यात आला आहे. सद्य:परिस्थितीत महापालिकेकडून प्रतिदिन १ हजार ३५० एमएलडी पाणीवापर करण्यात येतो. त्यानुसार गेल्या वर्षभरात १६.५० टीएमसी पाणी वापर झाला आहे. त्यामुळे मंजूर पाणीवापरापेक्षा पाच टीएमसी पाणी जास्त वापरल्याचे या अहवालात जलसंपदा विभागाने नमूद केले आहे. महापालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी पाच टीएमसी पाणी एका वर्षांमध्ये वापरण्याची सरकारची परवानगी आहे. मात्र, लोकसंख्या वाढीमुळे अतिरिक्त ६.५ टीएमसी कोटा वाढवून देण्यात आला आहे. सध्या ११.५० टीएमसी पाणीवापर मंजूर आहे.

खडकवासला प्रकल्पांतर्गत खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही चार धरणे आहेत. नवीन मुठा कालवा हा २०२ किलोमीटर लांबीचा असून, त्याची विसर्गक्षमता १ हजार ६५० क्युसेक आहे. या धरणांतून नवीन मुठा कालव्यामार्फत जिल्ह्य़ातील हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती या चार तालुक्यांमधील ६२ हजार १५० हेक्टर क्षेत्राची सिंचनाची व्यवस्था केली जाते. तसेच या कालव्यातून वरवंड आणि शिर्सुफळ या तलावांत पाणी सोडून त्याद्वारे जनाई व शिरसाई उपसा सिंचन योजनांद्वारे १३ हजार ८३५ हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची तरतूद करण्यात येते. या कालव्यातील पाणी हे नीरा डावा कालव्यामध्ये सोडून इंदापूर तालुक्यातील ११ हजार ३८८ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाची तरतूद केली जाते.

जिल्ह्य़ातील उर्वरित भागात पाण्याच्या एका आवर्तनासाठी सव्वाचार टीएमसी पाण्याची गरज असते. तसेच ३१ संस्थांना औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा केला जातो, असेही अहवालात म्हटले आहे.

जलसंपदा विभागाच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

  • पुणे महापालिका आगामी ९३ दिवसांसाठी ४.३७ टीएमसी म्हणजे मंजूर पाणीवापरापेक्षा १.४२ टीएमसी पाणी जास्त वापरणार.
  • पुणे महापालिकेच्या अतिरिक्त पाणी वापरामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामातील सिंचनाच्या आवर्तनावर ताण.
  • बिगर सिंचनाच्या पाण्याचा काटकसरीने वापर होण्याची आवश्यकता.
  • सिंचनाच्या वापराशिवाय पुणे शहर, दौंड व इंदापूर नगरपालिका, २२ ग्रामपंचायती, ९२ संस्थांना पिण्याचे पाणी दिले जाते.