फेसबुकच्या मदतीने वडील मुलाची १५ दिवसांनी भेट झाली आहे. फेसबुकचा वापर योग्य रितीने केल्यास काय घडू शकते याचे उदाहरण  सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दिले आहे. १५ दिवसांपूर्वी झेकरिया चेरीयन (वय-५०)  वर्ष हे त्यांच्या मुलाच्या घराबाहेर पडले, मात्र परत घरी जाण्यासाठी रस्ता विसरून गेल्याने, मुलगा आणि वडील हे दुरावले होते. दहा ते बारा किलोमीटर पायी चालत ते सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात आले, त्यांना कोणीतरी पोलीस ठाण्यात सोडले आणि निघून गेले.

चेरीयन यांच्याकडे विचारपूरस करण्यात आली मात्र त्यांना काहीच सांगता येत नव्हते. ते केवळ मुलाचे नाव सांगत होते. तेवढ्याच आधारे पोलिसांनी फेसबुक वर मुलाचे नाव शोधून संबंधित मुलगा हाच आहे का असे विचारून ओळखण्यास सांगितले. त्यावेळी चेरीयन यांनी त्यांच्या मुलाला ओळखले आणि अवघ्या दीड तासात मुलाची आणि वडिलांची भेट घडवून आणली. मुलाला पाहताच वडील चेरीयन यांना अश्रू अनावर झाले होते.

झेकरीया चेरियन वय-५० वर्ष हे काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथील राजेश चेरीयन मुलाचे घरी राहत होते. त्यांना मराठी येत नाही, तर हिंदी देखील व्यवस्थित बोलू शकत नव्हते. १५ दिवसांपूर्वी ते बाहेर फिरण्यासाठी आले, मात्र घरी परत जाण्याचा रस्ता विसरून गेले. वडील परत न आल्याचे पाहून मुलगा राजेश याने वडिलांचा परिसरात खूप शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. अखेर त्यांनी आकुर्डी पोलीस चौकीत वडील हरवल्याची तक्रार दिली. स्वतः देखील वडिलांना शोधण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु वडील सापडत नव्हते. शुक्रवारी ते सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका त्रयस्थ व्यक्तीने त्यांना आणले. पोलिसांना अगोदर हा व्यक्ती मनोरुग्ण वाटला, मराठी आणि हिंदी व्यवस्थित येत नसल्याने चौकशीसाठी अडचण येत होती. अखेर केरळी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीशी त्यांचं बोलणं करून दिलं. त्यानंतर सविस्तर माहिती दिली. त्यांनी राजेश हा मुलगा असल्याचे सांगितले.

याच माहिती वरून पोलीस कर्मचारी दत्ता नांगरे यांनी फेसबुकवर या नावाचा व्यक्ती आहे का? हे पाहिले तेव्हा त्याच नावाच्या अनेक प्रोफाईल समोर आल्या.    झेकरिया यांना काही फोटो दाखविले त्यावेळी त्यांनी मुलगा राजेश ला ओळखले. फेसबुक पेज पाहिले असता त्यात मुलगा राजेश ने वडील हरवल्याची पोस्ट टाकलेली होती त्यामुळे पोलिसांची देखील खात्री पटली आणि त्यावर दिलेल्या नंबरवर फोन करून राजेश यांना सांगवी पोलीस ठाण्यात बोलवून घेऊन मुलाची आणि वडिलांची भेट घडवून दिली.अक्षरशः मुलाला पाहून वडिलांचा बांध फुटला आणि ते रडू लागले. तब्बल १५ दिवसांनी ते दोघे ही एकमेकांना भेटत होते. फेसबुकच्या मदतीने वडील आणि मुलाची भेट झाली.