इंग्रजी ही धनाची भाषा असली तरी मराठी ही मनाची भाषा आहे. त्यामुळे मराठीचा समृद्ध वारसा विसरू नका, असे आवाहन साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले.

अक्षरधाराच्या रौप्यमहोत्सवी सांगतेनिमित्त राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेसतर्फे आयोजित ‘दीपावली शब्दोत्सवा’चे उद्घाटन विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने दिब्रिटो बोलत होते. राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मांडके हिअिरग सर्व्हिसेसच्या डॉ. कल्याणी मांडके, अक्षरधाराचे रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर या वेळी उपस्थित होत्या.

दिब्रिटो म्हणाले,की सारे दीप अद्याप मंदावलेले नाहीत. पुस्तके माणसाला एकाकी वाटू देत नाहीत. ग्रंथ आपले मित्र, गुरू आणि जगण्याचे आधार कार्ड आहे.

मुंबईतील १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट दुबईत रचण्यात आला हे न्यायालयासमोर सिद्ध करायचे होते. या बॉम्बस्फोटात पाकिस्तानचा सहभाग होता हे सिद्ध करू शकलो नाही ही रुखरुख अजूनही वाटते, अशी खंत निकम यांनी व्यक्त केली. अजमल कसाब ही शिडी वापरता आल्याने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झाला. पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसतो हे या खटल्यामुळे सिद्ध झाले, असे त्यांनी सांगितले. शास्त्रज्ञ भाबडे असतात. त्यांनाही रडवता येते. ते राजकारण्यांना चांगले जमते, अशी टिप्पणी निकम यांनी या वेळी केली