आता पुण्यातील नागरिकांना हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि हातगाडय़ांवरही आरोग्यास सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थाची खात्री मिळू शकणार आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) शुक्रवारी ‘मिशन सेफ फूड इंडिया’ या मोहिमेची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या मोहिमेची सुरुवात पुण्यापासून करण्यात येणार आहे. पुणे देशातील पहिले सुरक्षित अन्न मिळणारे शहर व्हावे असा या उपक्रमाचा उद्देश आहे.
एफडीएचे आयुक्त महेश झगडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अन्न विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे, औषध विभागाचे सहआयुक्त बा. रे. मासळ, ‘बिंद्राज् हॉस्पिटॅलिटी’ या कंपनीचे अध्यक्ष गुरविंदर बिंद्रा या वेळी उपस्थित होते.
प्रथम हॉटेल्स व रेस्टॉरंट्सच्या मालकांना आरोग्यास सुरक्षित अन्नपदार्थाबद्दलचे प्रशिक्षण देणे, त्यानंतर या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि तिसऱ्या टप्प्यात रस्त्यावरील अन्नपदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्याचा या मोहिमेत समावेश असणार आहे. पंधरा ऑगस्टच्या आसपास पुण्यातील एक हजार हॉटेल व रेस्टॉरंट मालकांना एफडीएच्या नियमांबद्दल एकत्रितपणे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रस्त्यावरील अन्नपदार्थ विक्रेत्यांना त्यांच्या भागात जाऊन प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित अन्नाबाबतच्या माहितीपुस्तिकांचे वाटपही करण्यात येणार आहे. बिंद्राज हॉस्पिटॅलिटी आणि इंडियन हॉस्पिटॅलिटी व्हेंचर्स या कंपन्या एफडीएला या मोहिमेत साहाय्य करणार आहेत.   
झगडे म्हणाले, ‘‘आपण खातो ते अन्न आरोग्यास सुरक्षित असेलच ही धारणा घातक आहे. देशाला जशी अन्नसुरक्षेची गरज आहे तसेच हे अन्न आरोग्यास सुरक्षित असण्याचीही आवश्यकता आहे. त्यामुळे व्यक्तीपातळीपासून सुरूवात करून कुटुंब, शहर, राज्य आणि देश असा या मोहिमेचा विस्तार होणे अपेक्षित आहे. अन्नपदार्थ बनविणारे लहान व्यावसायिक आणि गृहिणींपासून रस्त्यावर चणे, पाणीपुरी किंवा भाजी विकणाऱ्या विक्रेत्यालाही अन्नाच्या सुरक्षिततेबद्दल माहिती असली पाहिजे.’’