अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) महामार्गावरील धाब्यांची तपासणी वेगात सुरू करण्यात आली असून आतापर्यंत ४५ धाब्यांची तपासणी करून त्यांपैकी ३५ धाब्यांना नोटिस देण्यात आल्या आहेत. अन्न विभागाचे सहायक आयुक्त शिवाजी देसाई यांनी ही माहिती दिली.
मागील आठवडय़ात धाब्यावरील अन्न खाल्ल्यानंतर पुण्यातील दोन कामगारांचा विषबाधा होऊन मृत्यू झाला होता. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर अन्न विभागाने धाब्यांच्या तपासणीसाठी मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग, सोलापूर महामार्ग, भोर हद्दीपर्यंतचा कोल्हापूर रस्ता, मुळशी रस्ता व पौड फाटा या ठिकाणच्या ४५ ढाब्यांची तपासणी करण्यात आली आहे. यांपैकी २ ते ४ धाब्यांकडे परवाने नसल्याचे आढळले आहे. या धाब्यांना परवाने काढण्यासाठी आणि जुन्या परवान्यांच्या नूतनीकरणासाठी ठरावीक मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत या धाब्यांनी परवाने न घेतल्यास त्यांच्यावर दंडात्मक तसेच न्यायालयीन कारवाई होऊ शकते. ज्या धाब्यांना गुणवत्ता सुधारण्यासंबंधी नोटिस बजावण्यात आल्या आहेत, त्यांनीही पंधरा दिवसांत गुणवत्ता सुधारणे आवश्यक आहे.