गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू आणि सुगंधी सुपारीची छुपेपणाने होत असलेली विक्री थांबवण्यासाठी सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमेत आता नागरिकही सहभागी होणार आहेत. आपल्या परिसरात कुठेही गुटख्याची विक्री किंवा साठवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिक एफडीएला एका विशिष्ट क्रमांकावर त्यासंबंधीची ‘टिप’ देऊ शकणार आहेत.
अन्न विभागाने नागरिकांसाठी ०२०-२४४३०११३ हा दूरध्वनी क्रमांक जाहीर केला आहे. या क्रमांकावर नागरिकांनी विभागाला गुटखा विक्रीसंबंधीची माहिती कळवावी, असे आवाहन सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी केले आहे.
एफडीएने नुकताच कोथरूडमधून एका व्यक्तीच्या राहत्या घरी छापा टाकून दीड लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. अभय राजकुमार शहा असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्या घरात एफडीएला १ लाख ५८ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा सापडला. यात आरएमडी पानमसाला, एम च्युइंग टोबॅको, गोवा व आरएमडी गुटखा, राजू इलायची सुपारी, रिमझिम टोबॅको या पदार्थाचा समावेश आहे. संबंधित विक्रेत्याविरूद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. सहायक आयुक्त सं. भा. नारागुडे, दिलीप संगत आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.