मोहरी तेल आणि राईस ब्रॅन तेलाचे अनधिकृतपणे मिश्रण करून विकल्याबद्दल अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) मार्केट यार्ड येथील विक्रेत्याकडून २ लाख ९१ हजारांचे तेल जप्त करण्यात आले आहे.
मार्केट यार्डमधील ‘अगरवाल ट्रेडिंग कंपनी’ या विक्रेत्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विक्रेता विकत असलेल्या तेलाच्या मिश्रणात ६० टक्के मोहरीचे तेल तर ४० टक्के राईस ब्रॅन तेल होते. ही दोन्ही तेले राजस्थान येथील लक्ष्मी इंडस्ट्रीज या उत्पादक कंपनीने बनवलेली आहेत. अशा प्रकारे दोन किंवा अधिक तेलांचे मिश्रण करून विकण्यासाठी ‘अॅगमार्क’ प्रमाणपत्र घ्यावे लागते. हे प्रमाणपत्र विक्रेत्याकडे नसल्याचे अन्न विभागाचे सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी सांगितले.
कारवाईत तेलाचे १५ किलोचे ५१ डबे, ५ लिटरचे १३६ डबे आणि अर्धा लिटरच्या २,२३६ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मालाची किंमत २,९१,१३३ रुपये आहे. सहायक आयुक्त शिवाजी देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी पराग नलावडे आणि रमाकांत कुलकर्णी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.