कृष्णा पांचाळ

पिंपरी-चिंचवडमधील एक कुटुंब मलेशियाला पर्यटनासाठी गेलं आहे. या कुटुंबानं परतल्यानंतर सोसायटीत दाखल होण्यास मज्जाव करावा यासाठी या सोसायटीतील सदस्यांनी पोलिसांत धाव घेतली होती. मात्र, आता या सदस्यांनी यूटर्न घेत या कुटुंबाला सोसायटीत यायला बंधन नसलं तरी त्यांना जर करोनाची बाधा झालेली असेल आणि त्यामुळे सोसायटीतील सदस्यांना याची लागण झाली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न सोसायटीच्या अध्यक्षांनी उपस्थित केला आहे. लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीशी ते बोलत होते.

सोसायटीचे चेअरमन म्हणाले, “परदेशात गेलेल्या या कुटुंबाचं इथं घर आहे, त्यामुळे सोसायटीत येण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही. मात्र, जे नागरिक परदेशातून सोसायटीत येणार आहेत त्यांच्यासाठी पोलिसांकडे काही गाईडलाईन्स आहेत का? याबाबत कोणाला कळवायच? ज्यामुळे प्रशासन त्यांच्यावर लक्ष ठेवेल. यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी आम्ही केवळ पोलिसांकडेच नाही तर विविध सरकारी लोकांकडेही गेलो होतो.”

चीनमध्ये फैलाव होत असतानाच इथल्या पर्यटकांवर बंधन का आणली नाहीत?

चीनमध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असतानाच आपल्या सरकारनं कठोर पावलं उचलायला पाहिजे होती, निर्बंध घालायला हवे होते, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. ८ तारखेला इथून अनेक जण मलेशिया, दुबई, चीन किंवा इतर ठिकाणी फिरायला जात होते. त्याचवेळी करोना विषाणूचा संसर्ग भारतात आढळून आला त्यावेळी शासनाने बंधनं का आणली नाहीत? फिरायला जाणाऱ्यांवर बंधन आणली पाहिजे होती. जी आता आणली जात आहेत. माझ्या मनात जे भीतीचं वातावरण आहे ते इतरांच्या मनात देखील आहे, अशा शब्दांत त्यांनी मनातली भीती बोलून दाखवली.

चौदा दिवसांनंतर चाचणी पॉझिटिव्ह आल्यास जबाबदार कोण?

एखाद्या व्यक्तीला बाधा झाली तर १४ ते २७ दिवसांनंतर त्यांच्यामध्ये लक्षणं दिसून येतात. त्याप्रमाणे मलेशियाला गेलेलं कुटुंब आमच्या सोसायटीत परतल्यानंतर १४ दिवसांनी जर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आणि तोपर्यंत इतर लोकांना याची बाधा झालेली असेल तर त्याची जबाबदारी कोण घेईल? प्रशासनाकडे यबाबत काही गाईडलाईन्स आहेत का? असे अनेक प्रश्नही त्यांनी प्रशासनाला विचारले आहेत.

“मलेशियाला गेलेलं हे कुटुंब माझ्या घरासमोरचं राहतं त्यामुळे मला जास्त भीती वाटत आहे. ते परत आल्यानंतर काय करू हे मला कळत नाही. त्यामुळे मीच घर सोडून निघून जावं की काय असा विचार करतोय,” अशी भीतीयुक्त भावनाही या सदस्यानं व्यक्त केली आहे.