शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ असलेल्या वाहतूक बेटामुळे पलीकडची वाहने दिसत नाहीत, त्यामुळे त्यांची उंची कमी करावी, अशी मागणी मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
या चौकात वाहतुकीचे बेट आहे. त्याला वळसा घालून वाहने जातात. या बेटाची उंची कमी करण्यात यावी, या मागणीचे निवदेन पुणे महापालिका आयुक्त विकास देशमुख यांना देण्यात आले आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी दिली.
‘ओंकारेश्वर मंदिराच्या चौकामध्ये असलेल्या वाहतुकीच्या बेटाची उंची जास्त आहे. तसेच, त्याच्यावर लावण्यात आलेल्या झाडांमुळे मंदिराकडून शनिवार पेठेकडे जाणारा रस्ता किंवा पेठेतून रामजी शिंदे पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाहनांना पलीकडची वाहने दिसत नाहीत. त्यामुळे हा चौक भुलभुलैया असल्याचा भास निर्माण होत असून मृत्यूचा सापळा बनला आहे,’ असे या निवेदनात म्हटले आहे. ‘संबंधितांना रस्ता दुभाजकांची पाहणी करण्याचे आदेश द्यावेत व कोणताही गंभीर अपघात घडण्यापूर्वी त्वरित पावले उचलावीत,’ अशी मागणी या निवदेनाद्वारे करण्यात आली आहे.