शहरात रात्री आणि पहाटेच्या गारठय़ात पुन्हा वाढ

पुणे : काहीशा उशिराने दाखल झालेली थंडी आता फेब्रुवारीचा पहिला आठवडा संपत आला, तरी पाठ सोडताना दिसत नाही. पुणे शहर आणि परिसरातील किमान तापमानाच्या पाऱ्यात पुन्हा एकदा घट झाल्याने रात्री आणि पहाटेचा गारठा वाढला आहे. शहरात शुक्रवारी १०.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुण्यासह मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरल्याने थंडीत वाढ झाली आहे.

थंडीचा हंगाम यंदा उशिराने सुरू झाला होता. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रथमच संपूर्ण डिसेंबर महिना कडाक्याच्या थंडीविना गेला. डिसेंबरमधील थंडीची उणीव यंदा जानेवारी महिन्याने भरून काढली. जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर शहर आणि परिसरात थंडीच्या लाटेची स्थिती होती. या कालावधीत दोन ते तीन दिवस किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली गेला होता. १७ जानेवारीला शहरात यंदाच्या हंगामातील नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर तापमानात चढ-उतार होत राहिले. मात्र, जानेवारीबरोबरच फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून शहरात कमी- अधिक प्रमाणात थंडीचे अस्तित्व राहिले.

गेल्या महिन्यापासून शहरात कधी निरभ्र आकाशाची स्थिती, तर कधी अंशत: ढगाळ वातावरण राहते आहे. त्यामुळे किमान आणि कमाल तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. गेल्या आठवडाभर शहरातील किमान आणि कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत वाढले होते. त्यामुळे रात्रीची थंडी कमी होण्यासह दिवसा उन्हाचा चटका काहीसा वाढला होता.  मात्र, दोन दिवसांपासून तापमानात पुन्हा बदल झाला आहे. १४ अंशांपर्यंत गेलेले किमान तापमान आणि ३० अंशांपुढे गेलेले कमाल तापमान पुन्हा घटले आहे. गुरुवारी (६ फेब्रुवारी) शहरात १३.८ अंश किमान, ३१. ० अंश कमाल तापमान नोंदविले गेले होते.

एकाच दिवसात त्यात मोठय़ा प्रमाणावर घट होऊन शुक्रवारी किमान तापमानाचा पारा १०.१ अंशांवर, तर दिवसाचे कमाल तापमान २९ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे संध्याकाळनंतर गारठा जाणवत आहे. दुपारी उन्हाचा चटकाही घटला आहे.

आठवडय़ाच्या तापमानाचा अंदाज

शहर आणि परिसरात सध्या आकाशाची स्थिती अंशत: ढगाळ आहे. सकाळी तुरळक ठिकाणी धुके पडते आहे. त्यातच किमान तापामानात घट झाल्याने गारठा वाढला आहे. ही स्थिती आणखी एक ते दोन दिवस कायम राहणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे तापमान कायम राहू शकते. ९ किंवा १० फेब्रुवारीनंतर आकाश  सामान्यत: ढगाळ राहणार आहे. परिणामी किमान आणि कमाल दोन्ही तापमानामध्ये काहीशी वाढ होऊ शकेल. १२ किंवा १३ फेब्रुवारीनंतर आकाश पुन्हा मुख्यत: निरभ्र राहणार आहे. त्यामुळे तापमानात पुन्हा घट नोंदविली जाण्याची शक्यता आहे.