पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागाचे संचालक डॉ. भूषण पटवर्धन यांना नॅशनल अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सची फेलोशिप मिळाली आहे.
नॅशनल अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेतर्फे आरोग्यशास्त्रातील विविध शाखांवर संशोधन करणाऱ्या संशोधकांना फेलोशिप देण्यात येते. देशपातळीवरील संशोधकांची माहिती मागवून त्यातील २० संशोधकांना ही फेलोशिप मिळते. या वर्षी बायोकेमिस्ट्री या उपशाखेतील ‘आयुर्वेद अँड इंटिग्रेटिव्ह हेल्थ’ या विषयातील संशोधनाबद्दल डॉ. पटवर्धन यांना फेलोशिप देण्यात आली आहे. अॅकॅडमीच्या २६ ऑक्टोबरला जोधपूर येथे होणाऱ्या पदवीदान समारंभामध्ये ही फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे.
विद्यापीठांची आंतरराष्ट्रीय क्रमवारी जाहीर करताना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांच्या फेलोजचीही पाहणी केली जाते. पुणे विद्यापीठातील संशोधकांना यापूर्वी इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमी आणि इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्स या संस्थांची फेलोशिप मिळाली आहे.