देशामध्ये सध्या मालकीचा गोंधळ सुरू आहे. सर्वावर आपलीच मालकी, आपलाच इतिहास आणि आपलेच पुढारी थोपविण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याने गोंधळाचे वातावरण आहे, असे परखड भाष्य ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी शनिवारी सद्य:स्थितीवर केले. मातृभाषेतून शिक्षणाचा पुनरुच्चार करताना ‘इंग्रजी हटाव सेना’ची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले आणि बाकीच्या ‘सेना’ काही कामाच्या नाहीत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
‘दि फग्र्युसोनियन्स’ या फग्र्युसन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नेमाडे यांना ‘फग्र्युसन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे, जलतरणपटू रोहन मोरे आणि दृष्टिहीनांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील खेळाडू अमोल करचे यांना ‘फग्र्युसन अभिमान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्यावतीने प्रदीप आपटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार राहुल नार्वेकर, संघटनेचे अध्यक्ष यशवंत मेहेंदळे, कार्याध्यक्ष अॅड. विजय सावंत या वेळी उपस्थित होते.
नेमाडे म्हणाले,‘‘माझ्या महाविद्यालयीन दशेत पुढारी हे सगळ्यांचे होते. त्यांची जातीनिहाय वाटणी झालेली नव्हती. ही शिस्त १९९० च्या दशकापर्यंत राहिली. १८ व्या शतकापर्यंत जाती पक्क्य़ा नव्हत्या. इंग्रजांनी खानेसुमारी करून जाती पक्क्य़ा केल्या. आता प्रत्येक जातीचे ‘मॉडेल’ आहेत, पण सगळ्यांचे ठरतील असे पुढारी नाहीत. एक भाषा बोललो म्हणजे एकाच जाणिवांचे ‘शेअिरग’ होते. आपली भाषा हीच मोठी जात आणि महाव्यवस्था निर्माण करीत असते. जगातील आठव्या-नवव्या क्रमांकाची बोली भाषा असलेली मराठी बाजूला टाकण्यासारखी नाही. आखाती देश, आफ्रिकन देशामध्ये इंग्रजी बोलली जात नाही. पण, भारतामुळे इंग्रजीला महत्त्व प्राप्त झाले. इंग्रजी हटाव सेना झाल्याखेरीज तरणोपाय नाही.’’
समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही फलकावर लिहिण्याची वचने झाली आहेत. महानगरात तोंड धुवायला लागलो की दोन बादल्या पाणी जाते. गावाकडे दहा किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. ही समता आहे का, असा सवालही नेमाडे यांनी केला. या देशामध्ये स्वातंत्र्य कुणाला आहे? समता आणि स्वातंत्र्य नाही तरीही बंधुभाव बाळगा असे सांगितले जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. फग्र्युसनच्या वसतिगृहामध्ये राहिलो नसतो तर कदाचित मी मोठा झालो नसतो. इंग्रजी न येणं हे समान सूत्र असल्यानं प्रत्येकाला एकमेकांशी बोललेलं समजायचं. पंचवीशीतील मुलांचे प्रश्न मी ‘कोसला’तून मांडले. मुलांच्या मनात भावनांची वादळे असली तरी प्रत्यक्षात त्यांचे प्रश्न कोणीच सोडवत नसतो, हे सूत्र असलेली ही कादंबरी चार पिढय़ांना भावली. त्यामुळे ‘कोसला’चे यश माझे नाही तर फग्र्युसनच्या वसतिगृहाचे आहे, असेही नेमाडे यांनी सांगितले.
‘‘मातृभाषेतून शिक्षण घेत नाही तोपर्यंत आयुष्य घडत नाही. त्यामुळे किमान शालेय शिक्षण तरी मातृभाषेतूनच दिले पाहिजे,’’ असे सुरेश प्रभू यांनी सांगितले.