पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील सत्यनारायणाच्या पूजेवरुन निर्माण झालेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. मंगळवारी पतित पावन संघटनेकडून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सत्यनारायण पूजा करण्यात आली असून या पूजेद्वारे संघटनेने प्रशासनाचे समर्थन करतानाच विरोध करणाऱ्यांचा निषेध केला आहे.

गेल्या आठवड्यात फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची पूजा करण्यात आली होती. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्यनारायण पूजेची गेल्या ४० वर्षांची परंपरा असल्याचे महाविद्यालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. मात्र, या पूजेला काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. भारतीय घटनेच्या मूलभूत तत्त्वानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धर्माचे धार्मिक विधी, सण, उत्सव इमारतीच्या भिंतीवर धार्मिक घोषवाक्य लिहिणे, धार्मिक प्रतिमा लावणे भारतीय संविधानानुसार निषिद्ध असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे होते.

फर्ग्युसनमधील पूजेचा वाद ताजा असतानाच मंगळवारी पतित पावन या विद्यार्थी संघटनेने प्रवेशद्वाराजवळ सत्यनारायणाची पूजा केली. संघटनेचे पदाधिकारी स्वप्नील नाईक म्हणाले, हिंदूंच्या सणावर आजवर अनेक वेळा संघटनांकडून आक्षेप घेतला गेला हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. भविष्यात हिंदू सणास विरोध केल्यास आमच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.