पुण्यातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये आता भर पडणार असून फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वायत्तता देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने महाविद्यालयाची शुक्रवारी पाहणी केली.
विद्यापीठावरील भार कमी करण्यासाठी ‘अ’ श्रेणीतील महाविद्यालयांना आणि शिक्षणसंस्थांना स्वायत्तता देण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले आहे. पुण्यामध्ये सध्या पाचच स्वायत्त महाविद्यालये आहेत. मात्र, त्यामध्ये फर्ग्युसनच्या नावाची आता भर पडणार आहे. स्वायत्तता मिळण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. जवळपास गेली अडीच वर्षे पडून असलेल्या या प्रस्तावावरची धूळ आता झटकली असून फर्ग्युसनला स्वायत्तता देण्याबाबतच्या हालचालींना आता वेग आला असून स्वायत्तता देण्याच्या दृष्टीने अभ्यास समितीने महाविद्यालयाची पाहणी केली असून येत्या दोन दिवसांमध्ये त्याबाबतचा अहवाल तयार करून त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठवण्यात येणार असल्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.
याबाबत फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांनी सांगितले, ‘‘समिताने महाविद्यालयाची पाहणी केली आहे. त्याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपर्यंत महाविद्यालयाला स्वायत्तता मिळू शकते.’’