‘द फग्र्युसोनियन्स’ या फग्र्युसन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘फग्र्युसन गौरव’ आणि ‘फग्र्युसन अभिमान’ या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. संघटनेच्या ७० व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार दिले जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अॅड. विजय सावंत यांनी सांगितले. जानेवारी २०१५ मध्ये पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
यंदाचा ‘फग्र्युसन गौरव’ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर ‘फग्र्युसन अभिमान’ हा पुरस्कार अर्थशास्त्रज्ञ डॉ. विजय केळकर, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, चित्रपट निर्मात्या व लेखिका सुमित्रा भावे आणि जगातील सात सागरी खाडय़ा पोहणारा आशिया खंडातील पहिला जलतरणपटू रोहन मोरे यांना देण्यात येईल. याच कार्यक्रमात फग्र्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कारही देण्यात येणार आहेत, असे संस्थेचे कार्यवाह यशवंत मोहोड यांनी सांगितले.