‘‘गायिका व्हायचे मी ठरवले नव्हते. संगीताचा वारसाही मला नव्हता. श्रोत्यांचा पाठिंबा नसेल तर गायक कलाकार केवळ ‘साधक’ राहतो. मला श्रोत्यांनी खूप प्रोत्साहन दिले. त्यांनीच मला ‘गायिका प्रभा अत्रे’ बनवले,’’ अशा भावना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केल्या. ‘द फग्र्युसोनियन्स’ या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अत्रे यांना सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या हस्ते ‘फग्र्युसन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या.
व्हाईस अॅडमिरल दिनेश देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, प्रा. नाना जोशी, ज्येष्ठ क्रीडापटू सिंधू पंडित हळबे, गौरवी वांबुरकर आणि शेरिल लिमये आदींचाही या वेळी सावंत यांच्या हस्ते ‘फग्र्युसन अभिमान पुरस्कार’ प्रदान करून गौरव करण्यात आला.
‘मला जी सुशिक्षित गायिका ही ओळख मिळाली त्यात माझी शाळा, फग्र्युसन महाविद्यालय आणि विधी महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे,’असे सांगून अत्रे म्हणाल्या, ‘‘फग्र्युसनमध्ये सायकलवरून येणारी अबोल आणि लाजरीबुजरी मुलगी आजची प्रभा अत्रे आहे हे मलाच खरे वाटत नाही. मला गायिका नव्हे तर डॉक्टर व्हायचे होते. पण इंजेक्शन घ्यायची वेळ आल्यावर माझी जी अवस्था व्हायची त्यावरून डॉक्टर व्हायला मी पात्र नाही असे लक्षात आले! त्यानंतर मामांच्या आग्रहामुळे मी विधी महाविद्यालयातून पदवी आणि सनदही घेतली. पण न्यायालयातील वातावरण अनुभवल्यावर तिथेही मी ‘अनफिट’ असल्याचे कळले. दरम्यान गायिका म्हणून माझे नाव होऊ लागले होते. श्रोत्यांचे प्रोत्साहनही मिळत होते. त्यांनीच मला ‘गायिका प्रभा अत्रे’ बनवले. विज्ञान आणि कायद्याची विद्यार्थिनी असल्यामुळे मला तर्कसंगत विचार मांडण्याची सवय लागली. संगीत म्हणजे केवळ मंचप्रदर्शन नव्हे; ते सर्व माध्यमांमधून अनुभवता आले पाहिजे या विचाराने मी शास्त्र व कलाविष्कार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.’’