पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर ताबा सुटलेली वाहने दुभाजक ओलांडून जात असल्याने पलीकडच्या मार्गिकेत जाऊन होणारे अपघात रोखण्यासाठी दुभाजकांवर ‘बायफ्रेन रोप’ ही सुरक्षाविषयक व्यवस्था उभारण्याचे काम अनेक दिवस रेंगाळले होते. प्रसिद्ध बांधकाम व्यावयासिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मोटारीला अपघात झाल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला असून, अशाप्रकारची सुरक्षा व्यवस्था उभारणीसाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत.
द्रुतगती मार्गावर रस्ते विकास महामंडळाबरोबरच (एमएसआरडीसी) पोलिसांनी सुचविलेल्या भागातही ‘बायफ्रेन रोप’ बसविण्यात येणार असून, पंधरा दिवसांत त्याचे काम सुरू होऊ शकेल, असे महामंडळातील सूत्रांनी सांगितले. द्रुतगती मार्गावर दुभाजक ओलांडून किंवा वाहने दुभाजकाला धडकून होणारे अपघात लक्षात घेता २५ किलोमीटरच्या भागामध्ये ‘बायफ्रेन रोप’ बसविण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला होता. या २५ किलोमीटरच्या क्षेत्राबरोबरच आता पोलिसांनी सुचविलेल्या काही अपघातप्रवण क्षेत्रांचा समावेशही बायफ्रेन रोप बसवण्याच्या कामात केला जाणार आहे. त्यानुसार पोलिसांकडून संबंधित ठिकाणे एमएसआरडीसीला कळवण्यात आली आहेत. घाट क्षेत्रामध्ये व तीव्र उताराच्या भागामध्ये सर्वाधिक अपघात होत आहेत. अशा भागाला प्राधान्य देण्यात येणार आहे. ‘बायफ्रेन रोप’मुळे अपघाताची तीव्रता कमी होऊ शकते. नियंत्रण सुटून एखादे वाहन दुभाजकाला धडकल्यास ते दुभाजक ओलांडून दुसऱ्या मार्गिकेवर जाण्याची शक्यता त्यामुळे कमी होऊ शकणार आहे. संबंधित वाहनाला बसणारा झटकाही ‘बायफ्रेन रोप’मुळे कमी होऊ शकेल.
एमएसआरडीसीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून, आधी ठरविलेल्या व नंतर पोलिसांनी सुचविलेल्या सर्व भागांमध्ये ‘बायफ्रेन रोप’ बसविण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कंपनीला हे काम देण्यात आले आहे. त्यामुळे पंधरा दिवसांत काम सुरू होऊ शकेल, असे सांगण्यात आले.