23 February 2019

News Flash

नाटक बिटक : रंगभूमीवर ‘स्वेच्छामूल्य’ संकल्पना रूढ होतेय

संस्थेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव होत आहे.

चिन्मय पाटणकर 

महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे १४ व १५ जुलैला प्रायोगिक नाटकांचा महोत्सव

 पुणे : तिकीट काढायचे आणि नाटक बघायचे ही आपल्याकडे वर्षांनुवर्षे रूढ असलेली पद्धत, मात्र आता ही पद्धत बदलून स्वेच्छामूल्याची संकल्पना मराठी रंगभूमीवर रूढ होऊ लागली आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे १४ आणि १५ जुलै रोजी तीन नाटकांचा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी तिकिटाऐवजी स्वेच्छामूल्य ठेवण्यात आले आहे.

संस्थेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव होत आहे. महोत्सवात शनिवारी

(१४ जुलै) सायंकाळी साडेसात वाजता ‘दू अँड मी’, रविवारी (१५ जुलै) सकाळी अकरा वाजता ‘जंबा बंबा बू’ आणि सायंकाळी साडेसात वाजता ‘जरा समजून घ्या’ ही नाटके हिराबाग येथील ज्योत्स्ना भोळे सभागृहात होणार आहेत.

या पूर्वी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची निर्मिती असलेल्या ‘चॅलेंज’ या व्यावसायिक नाटकाचे प्रयोग स्वेच्छामूल्य पद्धतीने झाले होते. त्याची बरीच चर्चाही झाली होती. आता प्रायोगिक रंगभूमीवरही स्वेच्छामूल्याचा प्रयोग रंगणार आहे.

‘प्रायोगिक नाटक म्हणजे कंटाळवाणे, वैचारिक आणि न कळणारे असा एक समज उगाच झालेला आहे. मात्र, प्रायोगिक नाटक तसेच किंवा तेवढेच नसते. प्रायोगिक नाटक मनोरंजक, आनंद देणारेही असते. प्रायोगिक नाटक म्हणजे हौशी मुलांचे नाटक नसते. तर मान्यवर रंगकर्मीही त्यात काम करतात. त्यामुळे प्रायोगिक नाटकालाही खर्च असतोच. मात्र, अनेक प्रेक्षकांना हे पटत नाही. त्यामुळे तीन नाटकांच्या महोत्सवासाठी तिकीट न ठेवता स्वेच्छामूल्य ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रेक्षकांनी नाटक पाहावे, त्यांना योग्य वाटते तितकी रक्कम प्रयोग संपल्यानंतर द्यावी, असे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

स्वेच्छामूल्य म्हणजे काय? 

स्वेच्छामूल्य म्हणजे प्रेक्षकांना नाटय़प्रयोग पाहण्यासाठी आधी तिकीट काढण्याची गरज नाही. तर नाटक पाहून झाल्यानंतर त्यांच्या मनाप्रमाणे रक्कम ते देऊ शकतात. परदेशात याला ‘हॅट कलेक्शन’ म्हणतात. नाटक झाल्यानंतर रंगकर्मी प्रेक्षकांसमोर टोपी फिरवतात, त्यात जमा होणारे पैसे नाटकाच्या चमूला मिळतात.

chinmay.reporter@gmail.com

First Published on July 12, 2018 3:32 am

Web Title: festival of experimental drama by maharashtra cultural center