गणेशोत्सवाच्या काळात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरातून गोळा केलेल्या मिठाईच्या नमुन्यांपैकी २ ते ३ नमुन्यांमध्ये खाद्यरंग वाजवीपेक्षा अधिक वापरला गेल्याचे निदर्शनास आले आहे. या पाश्र्वभूमीवर दिवाळीच्या तोंडावर एफडीएने पुन्हा मिठाई आणि किराणा सामानाच्या तपासणीची मोहीम सुरू केली असून मिठाईविक्रेत्यांना खाद्यरंगांच्या वापराबाबत दक्षता घेणे भाग पडणार आहे.
एफडीएचे सहायक आयुक्त दिलीप संगत म्हणाले, ‘‘मिठाईत खाद्यरंगांचा वापर जास्तीत जास्त १०० पीपीएम (पार्ट्स पर मिलिअन) इतकाच करता येतो. यापेक्षा अधिक खाद्यरंग वापरला गेल्यास मिठाईविक्रेत्यावर कारवाई होऊ शकते. गणेशोत्सवात मिठाईचा खप वाढत असल्यामुळे या काळात खवा आणि मिठाईच्या तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली होती. पुण्यातून गोळा केलेल्या मिठाईच्या नमुन्यांचे विश्लेषण केल्यावर २ ते ३ नमुन्यांमध्ये वाजवीपेक्षा अधिक खाद्यरंग आढळले.’’
मिठाई आणि खव्याबरोबरच दिवाळीच्या फराळासाठी किराणा सामानाचा खपही सध्या वाढलेला आहे. त्यामुळे रवा, मैदा, बेसन, वनस्पती तूप, साजूक तूप, खाद्यतेल अशा पदार्थाचे नमुनेही एफडीए गोळा करत असल्याचे संगत यांनी सांगितले. ५ ऑक्टोबरपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून आतापर्यंत पुणे विभागातून ४० ते ५० नमुने गोळा करण्यात आले आहेत. ‘पदार्थाच्या नमुन्यांचे विश्लेषण केल्यावर ते खाण्यास अयोग्य आढळले, तर संबंधित विक्रेत्यावर न्यायालयीन कारवाई होऊ शकते. तर पदार्थाचा दर्जा कमी आढळल्यास त्याला दंडास सामोरे जावे लागते,’ असेही संगत यांनी सांगितले.
‘चायनीज’ चॉकलेट्सवर लक्ष ठेवणार!
दिवाळीत एकमेकांना भेटवस्तू देण्यासाठी चॉकलेट्सचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. या चॉकलेट्सच्या दर्जाबरोबरच बाजारात कुठे चायनीज चॉकलेट्स तर येत नाहीत ना, याकडेही लक्ष ठेवणार असल्याचे दिलीप संगत यांनी सांगितले. २००९ मध्ये चीनमधून आयात झालेल्या चॉकलेट्सना भारतात बंदी घालण्यात आली आहे. चीनमधून आलेल्या काही पदार्थामध्ये ‘मेलामाइन’ हा घटक असून तो पोटात जाणे आरोग्यास हानीकारक ठरू शकते, असे कारण ही बंदी घालताना देण्यात आले होते.