महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात नागरिकांना केवळ हेलपाटेच मारावे लागतात आणि कोणतीही समस्या सुटत नाही, असा अनुभव तक्रारदारांना येतो. या नेहमीच घडणाऱ्या प्रकाराबरोबरच मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनाचे नियोजन एवढय़ा ढिसाळ पद्धतीने करण्यात आले होते की अखेर तक्रारदारांना आयुक्त कार्यालयात जमिनीवर बसून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधावे लागले.
महापालिकेत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी (सुटी असेल तर मंगळवारी) लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. विभागीय आयुक्तस्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिनामध्ये ज्या तक्रारींचे निराकरण होत नाही, अशा तक्रारींचे निवेदन महापालिकेत आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिनामध्ये देता येते. या लोकशाही दिनात महापालिका आयुक्तांनी उपस्थित राहावे अशी अपेक्षा असते. महापालिकेत मंगळवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तक्रारदारांची मोठी गर्दी झाली होती. मात्र प्रशासनाकडून या कार्यक्रमासाठीचे आयोजन योग्यप्रकारे करण्यात आले नव्हते. नागरिकांची गर्दी प्रत्येक लोकशाही दिनात होते. येणाऱ्या नागरिकांसाठी कोणतीही व्यवस्था केली जात नाही. तसाच प्रकार मंगळवारीही झाला. तक्रार देण्यासाठी तसेच निवेदने देण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी खुच्र्याचीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.
लोकशाही दिनामध्ये सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे, सेव्ह पुणे इनिशिएटिव्हचे दीपक बीडकर यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदने देण्यासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी वाढत गेल्यानंतर अखेर या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वानीच महापालिकेत आंदोलन सुरू केले. या सर्वानी आलेल्या नागरिकांसमवेत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी जमिनीवर बसकण मारली. त्यानंतर प्रशासनाची धावपळ झाली आणि नंतर नागरिकांसाठी काही व्यवस्था करण्यात आल्या.

महापालिकेत आयोजित केल्या जाणाऱ्या लोकशाही दिनामध्ये येणाऱ्या नागरिकांकडून फक्त निवेदने स्वीकारली जातात. त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. दर लोकशाही दिनात त्यांना चकरा माराव्या लागतात. त्यामुळे लोकशाही दिनात जे आदेश दिले जातात वा जे निर्णय घेतले जातात त्याची अंमलबजावणी होत नाही हेच स्पष्ट होते. येणाऱ्या नागरिकांची कोणतीही व्यवस्था प्रशासन करत नाही. वारंवार यावे लागणाऱ्या तक्रारदारांची संख्या मोठी आहे.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

लोकशाही दिनात किती वेळा यावे लागले..
एक तक्रारदार- चाळीस वेळा
तीन तक्रारदार- अकरा ते पंधरा वेळा
चौदा तक्रारदार- चार ते दहा वेळा
बारा तक्रारदार- तीन वेळा