पुण्यातील बुधवार पेठेत धक्क्या मारुती मंदिराजवळील एका कपड्याचा गोडाऊनला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशामक दलाचे ५ बंब तत्काळ घटास्थळी पोहोचल्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या आग विझवण्यात आली असून कूलिंगचे काम सुरु आहे. फटाक्यांच्या ठिणगीने ही आग लागली असावी अशी शक्यता अग्निशामकदलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शहरातील मध्यवर्ती आणि मुख्य बाजारपेठेचा भाग असलेल्या बुधवार पेठेतील एका कपड्याच्या गोडाऊनमध्ये रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही आग भडकली. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या भागातील रस्ते लहान आणि अरुंद असल्याने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत होत्या. मात्र, युद्धपातळीवर काम करीत जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे स्वरुप मोठे असल्याने तसेच आजूबाजूला दाट लोकवस्ती असल्याने अग्निशामक दलाचे बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.