‘फिफा’ फुटबॉल विश्वचषक स्पर्धाचा संपूर्ण जगावरच परिणाम झालाय, मग त्याला पुणे तरी कसे अपवाद का असेल? या काळात खाद्य पदार्थाच्या पुण्यातील ऑनलाइन बाजारपेठेत तब्बल ७० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पसंती आहे ती ‘फास्ट फूड’ला; त्यातही मुख्यत: ‘रोल्स’ अन् ‘रॅप’ यांसारख्या खाद्यपदार्थाना!
ऑनलाइन पदार्थ मागविण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘फूडपांडा.इन’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रोहित चढ्ढा यांनी ही माहिती दिली. त्यातून ऑनलाइन पदार्थ मागविणाऱ्यांची खाद्यसंस्कृती नेमकी कशी आहे याचा अंदाज येतो. अशा प्रकारे ऑनलाइन ऑर्डर देऊन घरी खाद्यपदार्थ मागविणाऱ्या पुणेकरांच्या संख्येत आता भर पडली आहे. हे पदार्थ मागविणाऱ्यांची सर्वाधिक पसंती असते ती फास्ट फूडला. गेल्या तीन महिन्यांमध्ये पुण्यात मागविण्यात आलेल्या एकूण पदार्थामध्ये अशा पदार्थाचे प्रमाण तब्बल ५५ टक्क्य़ांपेक्षा जास्त होते. मल्टिक्युझिन पदार्थाचे प्रमाण १७.५० टक्के, चायनीय पदार्थाचे प्रमाण १३ टक्के, तर इटालियन पदार्थाचे प्रमाण होते सुमारे ९ टक्के. या तुलनेत उत्तर भारतीय पदार्थाचे प्रमाण अगदीच नाममात्र म्हणजे- एक टक्क्य़ांच्या आसपास आहे.
मागवल्या जाणाऱ्या एकूण पदार्थामध्ये सर्वाधिक ५४ टक्के प्रमाण ‘रोल्स’, ‘रॅप्स’ यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ साडेपाच टक्के पसंती बिर्याणीला, तर चार टक्के पसंती चायनीज भात व नूडल्स यांना मिळते आहे.
‘फिफा’चा असाही परिणाम
सध्या सुरू असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकपमुळे ऑनलाइन खरेदीत ७० टक्के मोठी वाढ झाली आहे. हे पदार्थ मागविण्याच्या वेळा रात्रीच्याच म्हणजे फुटबॉलचे सामने ज्या वेळी असतात, त्या वेळच्याच आहेत. त्यात मुख्यत: तरुण वर्गाचा समावेश असल्याने त्यांचा अशा खाण्याकडे कल असतो, असेही ‘फूडपांडा.इन’कडून सांगण्यात आले.
पदार्थ घरी आल्यावरच पैसे
पदार्थासाठी पैसे देण्याची पद्धती पुणेकर ग्राहक अजूनही काळजी घेत असल्याचे पाहायला मिळाले आहे. पैसे देण्याच्या प्रकारात ३२ टक्के प्रमाण हे ऑर्डर्स देतानाच पैसे देण्याचे आहे, तर उरलेले म्हणजे तब्बल ६८ टक्के प्रमाण हे घरी पदार्थ आल्यावर पैसे देणाऱ्यांचे आहे.
सध्या खाद्यमहोत्सव
‘फूडपांडा.इन’तर्फे पुण्यात पुढील पंधरा दिवसांसाठी (१९ जुलैपर्यंत) खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या काळात आघाडीची रेस्टॉरंट्समध्ये विविध योजना व सवलती देण्यात येणार आहेत.