पंधरा वर्षीय ध्रुव जोशीचे यश

पुणे : जिद्द, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर सेरेब्रल पाल्सीसारख्या गंभीर आजारावर मात करून पंधरा वर्षांच्या ध्रुव जोशीने जाणता राजा या नाटकात भूमिका साकारण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. सेरेब्रल पाल्सी या आजाराचे स्वरूप पाहता ध्रुवचे हे यश अनेक रुग्णांसाठी प्रेरणादायी आहे.

ध्रुव दीड वर्षांचा असताना त्याला इतर बालकांप्रमाणे मांडी घालून बसता येत नसल्याचे तसेच तो उभा राहू शकत नसल्याचे डॉ. रवींद्र लोहोकरे यांच्या लक्षात आले. डॉ. लोहोकरे यांनी ध्रुवच्या पालकांना लहान मुलांच्या अस्थिविकारांचे तज्ज्ञ डॉ. संदीप पटवर्धन यांच्याकडे तपासण्यासाठी नेण्यास सुचवले. तपासणीनंतर डॉ. पटवर्धन यांनी ध्रुवला सेरेब्रल पाल्सी हा आजार झाल्याचे निदान केले. ध्रुवचे वय अवघे दीड वर्षांचे असल्याने फिजिओथेरपी उपचार तातडीने सुरू करण्यात आले.

ध्रुवचे वडील सुनील जोशी म्हणाले, दीड वर्षांच्या वयात ध्रुवला रोज सुमारे दीड ते दोन तासांचे फिजिओथेरपी उपचार दिले जात होते. त्या उपचारांचा त्याच्यावर चांगला परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आणि तो इतर बालकांप्रमाणे उभा राहू लागला. दरम्यान डॉ. पटवर्धन यांनी इंजेक्शन देऊन त्याचे पाय दोन महिने प्लास्टरमध्ये ठेवले. त्यानंतर ध्रुवने पायाच्या चवडय़ांवर चालण्याएवढी प्रगती केली. वयाच्या साधारण दहाव्या आणि बाराव्या वर्षी ध्रुवच्या पायांवर दोन अवघड शस्त्रक्रिया करण्यात आल्या, त्यानंतर ध्रुवच्या हालचाली इतर मुलांप्रमाणे सुधारल्या असून जाणता राजा या नाटकातील भूमिका, अभ्यास, वक्तृत्व, कथाकथन अशा सर्व गोष्टींमध्ये तो सहभागी होत असल्याचे जोशी यांनी सांगितले.

डॉ. संदीप पटवर्धन म्हणाले, मज्जासंस्थेतील बदलांमुळे बालकांच्या शारीरिक हालचालींवर येणाऱ्या नियंत्रणामुळे सेरेब्रल पाल्सी हा विकार उद्भवतो. अनेकदा असा विकार लपवण्याचा प्रयत्न पालक करतात, त्यातून योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने बालकांना संपूर्ण बरे होण्यात अडथळा येतो. ध्रुव योग्य वेळी उपचारांसाठी आल्याने त्याच्यावर उपचार करून त्याची सर्वसाधारण मुलांप्रमाणे चालणे, धावणे अशी प्रगती झाली.