शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार माध्यमिक शाळांतील पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळांना टप्प्याटप्प्याने जोडण्याचा, शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, वर्गाचे समायोजन करताना नवीन पद निर्माण करू नये असे स्पष्ट करण्यात आले असून, नवीन वर्गखोली बांधावी लागल्यास त्याचा आर्थिक भार शिक्षण संस्थांवर टाकला आहे.

खासगी अनुदानित माध्यमिक शाळेतील पाचवीच्या वर्गावरील कार्यरत शिक्षकाचे प्राधान्याने त्याच संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या इतर अनुदानित शाळेत समायोजन करावे. त्याच संस्थेत समायोजन शक्य नसल्यास दुसरा प्राधान्यक्रम म्हणून अन्य खासगी अनुदानित संस्थेत समायोजन करावे. त्या पद्धतीनेही समायोजन न झाल्यास तृतीय प्राधान्यक्रम म्हणून स्थानिक, नागरी स्वराज्य संस्थेच्या शाळेत समायोजन करावे. मात्र अंशत: अनुदानित शाळेतून पूर्णत: अनुदानित किंवा वाढीव टप्प्यावर अनुदानित शाळेत किंवा नागरी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत समायोजन करू नये. जेणेकरून शासनावर आर्थिक बोजा वाढणार नाही, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

आर्थिक भार शाळांवरच

*    राज्यातील ज्या शासकीय किंवा खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमध्ये पाचवीचा वर्ग आहे, तो तेथून वर्ग करून पहिली ते चौथी वर्ग असलेल्या स्थानिक, नागरी स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये किंवा खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने जोडण्यात यावा.

*   जिल्हा स्तरावर आणि जिल्हाअंतर्गत याबाबतची कार्यवाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संनियंत्रणाखाली करावी. हे करताना कोणत्याही शिक्षकाच्या वेतनाचा शासनावर आर्थिक बोजा पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

*  पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे समायोजन त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या घराजवळच्या खासगी अनुदानित, स्थानिक, नागरी स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळेत करावे. पहिल्या टप्प्यात पाचवीचा वर्ग जोडताना भौतिक सोयीसुविधा असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन करावे.

*  जिल्हा परिषद शाळेत नव्याने पाचवीचा वर्ग सुरू करायचा असल्यास आणि वर्गखोली उपलब्ध नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेने पर्यायी तात्पुरती व्यवस्था करावी किंवा नवीन वर्गखोलीचे बांधकाम करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नवीन प्रवेश नको

खासगी अनुदानित शाळांनी या पुढे पाचवीमध्ये नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये. संबंधित विद्यार्थ्यांना परिसरातील प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यास सूचित करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पाचवीच्या वर्गाच्या समायोजनाच्या अंमलबजावणीसंदर्भातील बैठक होणार आहे. त्यानंतर समायोजनाच्या अंमलबजावणीचे चित्र स्पष्ट होईल.

– दिनकर पाटील, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय