राम मंदिर उभारणीसाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून राजकारणही तापलेलं असून, महाराष्ट्रात शिवसेनेविरोधात भाजपा युवा मोर्चाने फटकार मोर्चा काढला होता. शिवसेना भवनावर काढलेल्या या मोर्चावेळी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर भाजपाने संताप व्यक्त केला, तर शिवसेनेनेचे संजय राऊत यांनी आता शिवप्रसाद दिलाय, पुन्हा आले तर शिवभोजन थाळी देऊ, असा इशारा दिला. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनीही यावर प्रत्युत्तर देण्याची भूमिका मांडली आहे.

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे आज पुण्यात आले होते. शिवाजीनगर येथील मेट्रो कामाच्या पाहणीसाठी ते आलेले होते. मेट्रोच्या कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीनंतर भाजपाकडून शिवसेनेवर टीका केली जात आहे. याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना परब म्हणाले,”शिवसेना भवनासमोर जो राडा झाला, त्याचं उत्तर भाजपला दिलं जाईल,” अशा शब्दात परब यांनी भाजपाला इशारा दिला. तसंच पुणे मेट्रोचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा- ‘शिवप्रसाद’ दिला आहे, ‘शिवभोजन’ थाळी देण्याची वेळ आणू नका; हाणामारीवरुन संजय राऊतांचा भाजपाला इशारा

पुढे बोलताना ते म्हणाले, “शिवसेनेचा वर्धापन दिन हा आमच्यासाठी उत्सव असतो. मात्र यंदा करोनाचं सावट असल्याने साध्या पद्धतीने आणि सामाजिक उपक्रम हाती घेऊन साजरा केला जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन होईल,” अशी माहिती त्यांनी दिली.

एसटीबद्दल बोला…

अंबानी यांच्या घराबाहेर साडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. एनआयए या प्रकरणाचा तपास करत असून, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी काल (१७ जून) माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केलं आहे. या अटकेबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी परब यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर ‘एसटीबद्दल बोला,’ असं म्हणत परब यांनी शर्मा अटक प्रकरणात भाष्य करणं टाळलं.